अभिनेता अंशुमन विचारे हा मराठी मनोरंजन विश्वाताील लोकप्रिय अभिनेता. अंशुमनला आपण विविध सिनेमांमध्ये, कॉमेडी शोमध्ये अभिनय करताना पाहिलंय. अंशुमनची पत्नी पल्लवी विचारेसोबत नुकताच एक धक्कादायक अनुभव घडला आहे. पल्लवीने सोशल मीडियाच्या माध्यमातून हा अनुभव सर्वांसोबत शेअर केलाय. "मी मरता मरता वाचले", "माझा जीव गेला असता", अशा शब्दात पल्लवीने हा अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. काय म्हणाली पल्लवी?
डॉक्टरांचा मूर्खपणा भोवला, काय म्हणाली पल्लवी?
पल्लवीने युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. हार्मोनल चेंजेसमुळे पल्लवीला त्रास होत होता. म्हणून तिने आयुर्वेदिक उपचार घेण्याचा निर्णय घेतला. ठाण्यातील एका आयुर्वेदिक डॉक्टरकडे पल्लवीने उपचार घेण्याचं ठरवलं. डॉक्टरांसोबतच्या पहिल्या भेटीला ३५०० रुपये देऊन पल्लवीला काही गोळ्या देण्यात आल्या. दुसऱ्या भेटीला पंचकर्म करायला लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं. याशिवाय तिला डाएटही लिहून दिलं. त्यावेळी पल्लवीकडून ५०-६० हजार रुपये घेण्यात आले. पुढे ब्लड टेस्ट करावी लागेल असं, पल्लवीला सांगण्यात आलं.
ब्लड टेस्टसाठी सुई लावून इंंजेक्शनने रक्त काढून घेतील असं पल्लवीला वाटलं. परंतु तब्बल १० मिनिटं एका कॅप्सुल प्लॉटमध्ये हे रक्त काढण्यात आलं. डॉक्टर पल्लवीपासून एवढं रक्त काढण्याची पद्धत लपवून ठेवत होते. काहीतरी चुकीचं होतंय, याची तिला जाणीव झाली. तिने अंशुमनला फोन करुन बोलवून घेतलं. या दरम्यान पल्लवी बेशुद्ध झाली. छातीवर दाब देऊन डॉक्टर पल्लवीला उठवण्याचा प्रयत्न करत होते. अंशुमनने हे सर्व पाहिलं, त्याला काळजी वाटली. रक्त पाहून पल्लवी घाबरली अन् ती बेशुद्ध झाली, असं डॉक्टरांनी अंशुमनला सांगितलं.
गेल्या महिनाभरापासून पल्लवी बेडवरच होती. "डॉक्टरांच्या चुकीमुळे माझा जीव गेला असता", असं पल्लवी म्हणाली. या सर्व काळात अंशुमनने पल्लवीची काळजी घेतली. आता पल्लवी यातून बरी झाली असून, तिने हा अनुभव शेअर करत डॉक्टरांच्या चुकीच्या उपचाराविरुद्ध आवाज उठवला आहे.