Join us

... अन् वर्दीत गरज नसते इंट्रोची!, 'पी.एस.आय. अर्जुन' येतोय राडा घालायला, पाहा टीझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 14:18 IST

P.S.I. Arjun Movie Teaser : 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटानंतर दोन वर्षांनी अंकुश प्रेक्षकांच्या भेटीला यायला सज्ज झाला आहे. नुकताच 'पी.एस.आय. अर्जुन'या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhary) सतत चर्चेत असतो. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, ते म्हणजे त्याचा आगामी चित्रपट 'पी.एस.आय. अर्जुन'मुळे (P.S.I. Arjun Movie Teaser ). 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटानंतर दोन वर्षांनी अंकुश प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.  नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'पी.एस.आय.अर्जुन' या चित्रपटात अंकुश पहिल्यांदाच रुबाबरदार पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. अंकुशला या नव्या रूपात बघून त्याचे चाहतेही सुखावले आहेत. इतकेच नाही बॉलिवूडमधील आपला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख यालाही अंकुशच्या या नव्या लूकने भुरळ घातली आहे.

काही दिवसांपूर्वी अंकुश चौधरीने सोशल मीडियावर पी.एस.आय.अर्जुन सिनेमाचे पोस्टर शेअर केले होते आणि लिहिले की, 'अर्जुन माझ्या नावात... वर्दी माझी जोमात... गुन्हेगार कोमात...!  अंकुशचा पोलिसांच्या वर्दीतील हा डॅशिंग लूक चाहत्यांना खूप भावला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

या टीझरची सुरुवात एका घरातल्या चोरीने होते. त्यानंतर त्या चोराचा छडा  लावण्यासाठी पी.एस.आय.अर्जुन पुढे येतो. त्यानंतर त्याचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळतो. या सिनेमातील एक डायलॉग सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे, तो म्हणजे 'थांब म्हटलं की थांबायचं... या दमदार डायलॉगने सध्या अनेकांना वेड लावलं आहे. तरुणाई यावर रील्स बनवत आहेत. त्यामुळे अंकुश एका अनोख्या अंदाजात यात झळकणार असल्याचे दिसत आहे. या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित 'पी.एस.आय.अर्जुन'चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत. तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. येत्या ९ मे रोजी 'पी. एस. आय. अर्जुन' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :अंकुश चौधरी