Join us  

मेहंदी रंगली गं! अमृता-प्रसादच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर, अभिनेत्याने हातावर लिहिला खास संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 9:45 AM

"अमृतमय जाहलो", प्रसादने अमृतासाठी काढली खास मेहंदी, फोटोंनी वेधलं लक्ष

मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. 'बिग बॉस मराठी' फेम अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे लवकरच  विवाहबंधनात अडकणार आहेत. अमृता आणि प्रसादच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून नुकताच मेहेंदीचा कार्यक्रम पार पडला. याचे काही फोटो अमृताच्या सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आले आहेत. 

मेहंदीसाठी अमृताने पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान करत खास लूक केला होता. फुलांची ज्वेलरी घालत अमृता मेहंदीसाठी नटली होती. तर प्रसाद पारंपरिक वेशात दिसून आला. अमृताच्या हातावर प्रसादच्या नावाची मेहंदी रंगली. तिच्या मेहंदीच्या खास डिझाइनने लक्ष वेधून घेतलं आहे. तर प्रसादने त्याच्या हातावर अमृताच्या नावाची मेहंदी काढली आहे. "अमृतमय जाहलो" असं प्रसादने हातावर लिहिलं आहे. अमृताच्या मेहंदीच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

अमृता-प्रसादची लगीनघटिका समीप आली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात या दोघांची पहिली भेट झाली होती. घरात त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर येताच त्यांनी एकमेकांवरील प्रेमाची कबुली देत गुपचूप साखरपुडाही उरकला. १८ नोव्हेंबरला अमृता आणि प्रसाद लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 

अमृता आणि प्रसाद दोघेही उत्तम कलाकार आहेत. 'बिग बॉस'च्या घरातही या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली होती. आता त्यांच्या लग्नासाठी चाहते उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी लग्नपत्रिका शेअर करत सगळ्यांना लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. 'बिग बॉस'च्या थीमवर असलेली त्यांची लग्नपत्रिक व्हायरल झाली होती.

टॅग्स :अमृता देशमुखमराठी अभिनेताटिव्ही कलाकार