Join us  

अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 3:32 PM

अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टवरुन नवा राजकीय वाद रंगताना दिसत.

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचा धुरळा पाहायला मिळतोय. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. वेगवेगळ्या राजकीय मुद्देदेखील चर्चेत आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याच दरम्यान आता अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टवरुन नवा राजकीय वाद रंगताना दिसत. भाजप आणि आदित्य ठाकरे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. 

अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर विविध मुद्यांवर भाष्य करतात. नुकतेच त्यांनी कोस्टल रोडद्वारे जुहू ते मरीन ड्राईव्ह असा प्रवास 30 मिनिटांत केला. त्याबद्दल एक ट्विट केलं. त्यांनी लिहलं,  'वाह ! क्या बात है  ! साफ़ सुथरी  नयी बढ़िया सड़क, कोई रुकावट नहीं'. अमिताभ यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर भाजप महाराष्ट्रकडून त्यांना रिप्लाय देण्यात आला.

भाजपनं रिट्वीटमध्ये लिहलं, 'आज हमारे पास 'कोस्टल रोड' है… धन्यवाद अमिताभ बच्चन जी, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड टनलमधून तुम्ही प्रवास केलात, याचा आम्हाला आनंद आहे. देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि राज्याचे विकासपुरुष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळेच मुंबईकरांचा प्रवास वेगवान होतोय. भविष्यातदेखील मुंबईकरांना आणि राज्यातील जनतेला उत्तम दर्जाचे रस्ते आणि पायाभूत सोयीसुविधा मिळणार हीच मोदीजींची गॅरंटी'.

भाजपच्या या ट्वीटवर आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. कोस्टल रोडबाबत माहिती देत त्यांनी लिहिलं, "कोस्टल रोडचे श्रेय भाजप महाराष्ट्राने घेतले हे पाहणे हास्यास्पद आहे. कोस्टल रोड प्रकल्पाशी भाजपचा काहीही संबंध नाही, त्यांनी या प्रोजेक्टला मंजुरी देण्यासाठी 2 वर्ष घेतले. कोस्टल रोड प्रोजेक्टची घोषणा आणि अंमलबजावणी श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती'.

पुढे त्यांनी लिहलं, 'स्वत:हून न केलेल्या कामांसाठी नेहमीप्रमाणेच श्रेयासाठी हताश असलेल्या भाजपने अमिताभ बच्चन सरांचे ट्वीट रिट्वीट केलं. भाजप श्रेय घेण्याचा प्रयत्न करू शकतो, पण हे घडवून आणणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत हे मुंबईकरांना माहीत आहे', असंही आदित्य ठाकरेंनी ट्वीटमध्ये लिहिलं. यासोबतच आदित्य ठाकरे यांनी भाजपचा  दावा खोडून काढत कोस्टल रोडचं काम सुरु असतानाचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.  

टॅग्स :अमिताभ बच्चनमुंबईमुंबई कोस्टल रोडभाजपाआदित्य ठाकरेट्विटर