'सिकंदर' सिनेमा (sikandar movie) ईदच्या मुहुर्तावर रिलीज झाला. सलमान खानची सिनेमात प्रमुख भूमिका आहे. सलमानसोबत सिनेमात रश्मिका मंदाना पण झळकताना दिसतेय. हा सिनेमा सुपरहिट होऊन प्रेक्षकांचं प्रेम जिंकेल अशी चर्चा असतानाच 'सिकंदर' फ्लॉप झालेला दिसला. सलमान (salman khan) आणि रश्मिकाची (rashmika mandanna) जोडी पाहून प्रेक्षकांच्या संमीश्र प्रतिक्रिया दिसल्या. अशातच 'सिकंदर' सिनेमात सलमान-रश्मिकाच्या जोडीबद्दल 'गदर' फेम अभिनेत्री अमिषा पटेलने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.
'सिकंदर'बद्दल अमिषा काय म्हणाली
'सिकंदर' सिनेमात झळकलेली जोडी म्हणजे सलमान आणि रश्मिका मंदाना. दोघांच्या वयात ३१ वर्षांचं अंतर आहे. याविषयी मीडियाने 'गदर' फेम अभिनेत्री अमिषा पटेलला विचारलं असता ती म्हणाली की, "मी आणि सनी देओलने गदरमध्ये काम केलं. आमच्यातही २० वर्षांचं अंतर होतं. जर जोडी लोकांना आवडत असेल तर ती चालते", अशा मोजक्या शब्दात अमिषा पटेलने उत्तर दिलं. अमिषा पटेल 'सिकंदर' सिनेमाबद्दल पुढे म्हणाली की, "मला सलमानचा सिकंदर सिनेमा खूप आवडला. बाकी कुछ तो लोग कहेंगे लोगोका काम है कहना. लोकांना सध्या सिनेमा खास वाटत नाही पण सिकंदर मात्र थिएटरमध्ये चांगला चालतोय. त्यामुळे ज्यांना जे बोलायचंय, बोलू दे."
सिकंदरची बॉक्स ऑफिस कमाई
दरम्यान, सलमान खानच्या 'सिकंदर' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर जादू काही चालताना दिसत नाही. सिनेमाने पाचव्या दिवशी १० कोटी देखील कलेक्शन केलं नाही. 'सिकंदर'कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं चित्र निर्माण झालं आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सिकंदर सिनेमाने पाचव्या दिवशी फक्त ५.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत चित्रपटाने ९० कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. 'सिकंदर' इतर सिनेमांचे रेकॉर्ड मोडेल असं वाटत असतानाच या सिनेमाला अजून १०० कोटींचा टप्पाही ओलांडता आला नाही असं दिसतंय.