बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. चित्रपट आणि अभिनयासोबतच आपल्या सामाजिक कार्यातूनही चाहत्यांची मने जिंकतो. अक्षय कुमार हा सढळ हाताने मदत करण्यासाठी ओळखला जातो. तो भरपूर दानधर्मही करतो. अक्षय कुमारने वेळोवेळी सामाजिक क्षेत्रांमध्ये मदतीचा हातभार लावला आहे. सामाजिक क्षेत्रांप्रमाणे आता अक्षय कुमार धार्मिक क्षेत्रांमध्येही मदतीचा हातभार लावताना दिसत आहे. आता अक्षय कुमारचे अयोध्येवरील प्रेम दिसून आले आहे.
अक्षय कुमारनं अयोध्येतील माकडांच्या काळजीसाठी अंजनेय सेवा ट्रस्टला 1 कोटी रुपयांची देणगी देली आहे. अक्षय कुमारनं दिलेल्या देणगीमधून अयोध्येतील माकडांना हरभरा, गूळ आणि केळी खायला दिली जात आहे. याची एक सुंदर झलक अक्षय कुमारने व्हिडीओद्वारे शेअर केली आहे. कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, 'एक छोटासा प्रयत्न'. अक्षय कुमारने अयोध्येत माकडांच्या देखभालीसाठी केलेल्या या अनोख्या उपक्रमाचं कौतुक होत आहे.
अक्षय कुमार त्याचे आई -वडील हरिओम आणि अरुणा भाटिया आणि सासरे राजेश खन्ना यांच्या नावाने वेगवेगळ्या समाजकार्यासाठी दान करत असतो. त्याच्या या निर्णयामुळे अक्षय कुमारचे मानवता आणि निसर्गावरील प्रेम दिसून येत आहे. त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो अलिकडेच 'सिंघम अगेन'मध्ये दिसला होता. अक्षयचा आगामी चित्रपट 'स्काय फोर्स' हा ॲक्शन-ड्रामा आहे. हा चित्रपट 24 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. 'स्काय फोर्स' व्यतिरिक्त, अक्षयकडे सी. शंकरन नायर, 'जॉली एलएलबी 3', 'हाऊसफुल 5' हे सिनेमे आहेत.