Join us  

रणबीर कपूरच्या 'रामायण' मध्ये अजिंक्य देव यांचीही एन्ट्री, साकारणार 'ही' महत्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 5:56 PM

हिंदीतील बहुचर्चित 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव आणि आणकी एक मराठी कलाकार झळकणार.

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण'सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीराम आणि दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतामातेच्या भूमिकेत आहे. हिंदीतील या बिग बजेट सिनेमात काही मराठी कलाकारांचीही निवड झाली आहे. काही दिवसांपूर्वीच आदिनाथ कोठारे सिनेमात श्रीरामाचा भाऊ 'भरत'ची भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं. तर आता मराठीतील स्टार अभिनेता अजिंक्य देव यांचीही 'रामायण'मध्ये एन्ट्री झाली आहे.

अजिंक्य देव यांचे मराठीच नाही तर हिंदीतही चाहते आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व हे 'हिरो' या शब्दाला साजेसंच आहे. तसंच त्यांचा दमदार आवाज आजही तसाच आहे.नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमात त्यांचीही भूमिका आहे. महर्षी विश्वामित्र ही महत्वाची भूमिका त्यांच्या वाट्याला आली आहे. याबद्दल अधिक माहिती देताना ते 'महाराष्ट्र टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले," होय मी रामायणमध्ये एक भूमिका साकारणार आहे. त्याबाबतीत सध्या वाचन आणि अभ्यास सुरु आहे. त्यामुळे मी जास्त काही बोलू शकत नाही. लवकरच त्याचं शूटिंगही सुरु होईल तेव्हा सविस्तर सांगेन."

अजिंक्य देव यांना 'रामायण' मध्ये बघण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. बऱ्याच काळानंतर ते हिंदीत झळकणार आहे. याशिवाय त्यांचे आणखीही काही प्रोजेक्ट येणार आहेत. यामध्ये करिश्मा कपूरसोबतची 'ब्राऊन' ही वेबसीरिज आहे. याचं दिग्दर्शन अजिंक्य यांचा मोठा भाऊ अभिनय देव यांनी केलं आहे. आणखी काही मराठी सिनेमांमध्येही ते झळकणार आहेत. आश्विनी भावेसोबत तब्बल ३२ वर्षांनी ते एका चित्रपटात दिसणार आहेत.

टॅग्स :अजिंक्य देवमराठी अभिनेतारामायणरणबीर कपूरबॉलिवूडसिनेमा