Join us  

मस्करी करणं आलं होतं अजयच्या अंगाशी; सहकलाकाराच्या पत्नीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 9:21 AM

Ajay devgn: अजयने एका मुलाखतीमध्ये घडलेला किस्सा सांगितला होता.

बॉलिवूडमध्ये असंख्य सुपरहिट सिनेमा देणार अभिनेता म्हणजे अजय देवगण ( Ajay devgn). बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अजय खऱ्या आयुष्यात बराचसा मितभाषी आहे. मात्र, त्याने एखाद्या वेळी कोणाची मस्करी करायला सुरुवात केली तर तो थांबत नाही. विशेष म्हणजे त्याच्या स्वभावाची ही बाजू फारशी कोणाला माहित नाही. परंतु, त्याची हीच मस्करी एकेकाळी त्याच्या अंगाशी आली होती. त्याच्या मस्करीमुळे त्याच्या मित्राच्या पत्नीने चक्क आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता.

सध्या सोशल मीडियावर अजयची एक जुनी मुलाखत चर्चेत येत आहे. त्याने २०१८ मध्ये मिड-डेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या सहकलाकाराच्या पत्नीसोबत घडलेला किस्सा सांगितला.नेमकं काय घडलं होतं अजयसोबत?"काही वर्षांपूर्वी एक अभिनेता होता ज्याचं नुकतंच लग्न झालं होतं. सिनेमाचं आऊटडोअर शूट असल्यामुळे तो त्याच्या पत्नीला त्याच्यासोबत घेऊन आला होता. त्याची पत्नी इंडस्ट्रीशी निगडीत नसल्यामुळे तिला इंडस्ट्रीविषयी काहीही सांगितलं तरी खरं वाटायचं. एकदा तिची अशीच मस्करी केली. ज्यामुळे तिने टोकाचं पाऊल उचललं होतं", असं अजय म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "त्याची पत्नी एका छोट्याशा गावातून आली होती. त्यात आमच्या सिनेमाचं रात्रीच्या शूटचं शेड्युल होतं. त्यामुळे त्याची पत्नी सकाळी त्याला भेटायची. त्यामुळे आम्ही मुद्दाम तिला सांगायचो की, तुझ्या नवऱ्याचं दुसरीकडे अफेअर सुरु आहे. त्यामुळे तो रात्री दुसऱ्या एका स्त्रिला भेटायला जातो. रात्री कोणतंही शुटिंग नसतं. इतकंच नाही तर मी रात्री १०.३० झाले की माझ्या रुममध्ये परत येतो असंही सांगितलं. सुरुवातीला तिने हे मस्करीमध्येच घेतलं. आम्ही मज्जा करतोय हे तिला माहित होतं. पण, अचानक एक दिवस तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या ज्यामुळे तिला  हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं."

दरम्यान, सोशल मीडियावर ही बातमी समोर आल्यानंतर अनेकांनी अजयला ट्रोल केलं होतं. इतकंच नाही हा किस्सा जिच्यासोबत घडला होता ती वीरदासची पत्नी असल्याचं म्हटलं जात आहे. २०१५ मध्ये अजय आणि वीरदासने 'शिवाय' या सिनेमात एकत्र काम केल होतं.

टॅग्स :अजय देवगणबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा