Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉसची विजेती झाल्यानंतर मेघा धाडेला पैशांसोबतच मिळाले या ठिकाणी घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 11:49 IST

मेघा, पुष्कर आणि स्मिता या तिघांमध्ये चुरस होती. विशेषत: मेघा आणि पुष्कर यांच्यात अगदी काट्याची टक्कर होती. अखेर तो क्षण आला आणि ‘बिग बॉस मराठी’ची विजेती म्हणून मेघाचे नाव जाहीर करण्यात आले.

मैत्री, भांडण, प्रेम, वाद, विरोध, विविधांगी टास्क आणि आठवड्याच्या शेवटी रंगणारा विकेंडचा डाव  अशा वेगवेगळ्या अंगाने रंगलेल्या ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोच्या पहिल्या पर्वाचा विजेता कोण होणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर तो क्षण आलाच. आपल्या असण्याने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘जान’ आणणारी मेघा धाडे ही ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली. पुष्कर जोगला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

स्मिता गोंदकर, पुष्कर जोग, सई लोकूर, आस्ताद काळे यांना मात देत मेघा धाडे हिने ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. बिग बॉसच्या अंतिम फेरित शर्मिष्ठा राऊत प्रथम बाद झाली. पाठोपाठ आस्ताद काळे आणि सई लोकूर अंतिम फेरीतून बाहेर पडले. यानंतर उरले ते केवळ मेघा, पुष्कर आणि स्मिता. या तिघांमध्ये चुरस होती. विशेषत: मेघा आणि पुष्कर यांच्यात अगदी काट्याची टक्कर होती. अखेर तो क्षण आला आणि ‘बिग बॉस मराठी’ची विजेती म्हणून मेघाचे नाव जाहीर करण्यात आले.

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या आठवड्यापासूनच मेघा ही ट्रॉफीची प्रबळ दावेदार मानली जात होती. मेघाला १८ लाख ६० हजार इतकी धनराशी मिळाली आणि खोपोली येथे Nirvana Leisure Realty सिटी ऑफ म्युझिक कडून एक घर देण्यात आले.

‘बिग बॉस’च्या १०० दिवसांच्या वास्तव्यात मेघावर अनेक आरोप झालेत. ती बडबडी आहे, ती खोटारडी आहे, ती अप्रामाणिक आहे, असे अनेक आरोप तिने झेलले. सई आणि पुष्कर या ‘बिग बॉस’च्या घरातील तिच्या सर्वाधिक जवळच्या मित्रांनीही तिच्यावर हे आरोप केलेत. पण मेघा या आरोपांना पुरून उरली. मेघा, तू ‘बिग बॉस’च्या घरात ‘जान’ आणलीस, हे महेश मांजरेकर यांचे शब्द तिने अक्षरश: खरे ठरवलेत आणि सरतेशेवटी पुष्कर जोग, रेशम टिपणीस, आस्ताद काळे सारख्या दावेदारांना बाजूला सारत ‘बिग बॉस’ची ट्रॉफी आपल्या नावावर केली. 

टॅग्स :बिग बॉस मराठीमेघा धाडेसई लोकूरपुष्कर जोगस्मिता गोंदकर