Join us

अभिनेत्री वैदेही परशुरामी करणार 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २'चं सूत्रसंचालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 12:56 IST

Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' पहिल्या पर्वाला मिळाल्या उदंड प्रतिसादानंतर आता नवे छोटे उस्ताद सुरांची मैफल घेऊन सज्ज झालेत.

स्टार प्रवाहवर सुरु होतोय गाण्याचा दुसरा पर्व अर्थातच ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ (Mi Honar Superstar Chote Ustad). पहिल्या पर्वाला मिळाल्या उदंड प्रतिसादानंतर आता नवे छोटे उस्ताद सुरांची मैफल घेऊन सज्ज झालेत. १० जूनपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर लहानग्यांच्या सुरांची मैफल अनुभवता येणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री वैदेही परशुरामी या कार्यक्रमाचेे सूत्रसंचालन करणार आहे.   

सूत्रसंचालनाच्या अनुभवाविषयी सांगताना वैदेही म्हणाली, एका सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मी छोटे उस्तादच्या पहिल्या पर्वात सहभागी झाले होते. या मंचावरचे टॅलेण्ट पाहून मी भारावून गेले होते. इतका भरभरुन प्रतिसाद पहिल्या पर्वाला मिळाला. याच प्रेमापोटी दुसऱ्या पर्वाची घोषणा झाली आहे. दुसऱ्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्यावर आहे. ज्या पद्धतीचे टॅलेण्ट या मंचावर आहे ते पाहून अवाक व्हायला होते. इतक्या लहान वयात एवढा आत्मविश्वास पाहून खरंच मी भारावले आहे. 

सूत्रसंचालन नक्कीच आव्हानात्मक आहे

ती पुढे म्हणाली की, सूत्रसंचालन नक्कीच आव्हानात्मक आहे कारण इथे प्रसंगावधान राखावं लागतं. लहान मुलांसोबत जमवून घेणं आणि त्यांची काळजी घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मला लहान मुलं प्रचंड आवडतात त्यामुळे या कार्यक्रमाची खूप उत्सुकता आहे. खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत. मी नेहमीच वेगवेगळे लूक्स आणि स्टाईल ट्राय करण्याचा प्रयत्न करत असते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनवे लूक्स करण्याची संधी मिळणार आहे. माझ्या सूत्रसंचालनाची सुरुवात स्टार प्रवाहमुळेच झाली. प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा मी पहिल्यांदा होस्ट केला होता. सूत्रसंचालन ही कला आहे. स्टार प्रवाहने माझ्यातला हा पैलू मला शोधून दिल्याबद्दल मी आभारी आहे अशी भावना वैदेहीने व्यक्त केली. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व दुसरे १० जूनपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल.

टॅग्स :वैदेही परशुरामी