ठळक मुद्देयापूर्वी अलीकडे पायलने महान समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त मत मांडत सती प्रथेचे समर्थन केले होते.
सतत वादग्रस्त ट्विट करून चर्चेत राहणारी बिग बॉस फेम अभिनेत्री पायल रोहतगी हिला पोलिसांनी अटक कली आहे. पायलने स्वत: ट्विटरवरून ही माहिती दिली.काही दिवसांपूर्वी पायलने स्वातंत्र्य सेनानी मोतीलाल नेहरू यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत मोतीलाल नेहरू यांच्या पाच पत्नी होत्या आणि जवाहरलाल नेहरू त्यांचे पुत्र नसल्याचे आक्षेपार्ह विधान करण्यात आले होते.
पायलने हा व्हिडीओ शेअर करताच सोशल मीडियावर तिच्यावर टीकेची झोड उठली होती. यानंतर काँग्रेस नेते चरमेश शर्मा यांनी तिच्याविरोधात राजस्थान पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी पायल विरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर तिला अटक करण्यात आली.
पायलने काही मिनिटांपूर्वी ट्विटरवर याची माहिती दिली. ‘मोतीलाल नेहरू यांच्यावरचा व्हिडीओ शेअर केल्यामुळे राजस्थान पोलिसांनी मला अटक केली आहे. मी गुगलवरून माहिती घेत हा व्हिडीओ बनवला होता. बोलण्याचे स्वातंत्र्य एक विनोद आहे,’ असे टिष्ट्वट तिने केले. यात तिने राजस्थान पोलिस, पीएमओ, गृहमंत्रालयाच्या आॅफिशिअल ट्विटर अकाऊंटला टॅग केले आहे.यापूर्वी अलीकडे पायलने महान समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त मत मांडत सती प्रथेचे समर्थन केले होते. यानंतर पायलने थेट महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट टाकली होती.