Join us  

Video : ...म्हणून मला बॉलिवूडमध्ये काम मिळत नाही - मिलिंद सोमण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 5:42 PM

बॉलिवूडमधील या गोष्टीमुळे मिलिंद सोमण पुन्हा चर्चेत आला आहे.

मुंबई - सुपरमॉडल आणि अभिनेता मिलिंद सोमणची यंगस्टर्ससहीत सीनियर सीटीझन्समध्येही प्रचंड क्रेझ आहे. कोणत्या-ना-कोणत्या कारणांमुळे मिलिंद सतत चर्चेत असतो. कधी वयानं कमी असलेली बायको असो तर कधी फिटनेससंदर्भात सोशल मीडियावर अपलोड केले त्याचे फोटो किंवा व्हिडीओ असोत... या सर्वांची चर्चा झाली नाही असे होणे शक्यच नाही. अशाच एका गोष्टीमुळे मिलिंद सोमण पुन्हा चर्चेत आला आहे. चर्चेचं कारण आहे बॉलिवूड इंडस्ट्री...  बॉलिवूड आणि मिलिंद सोमण यांच्यात एवढं अंतर का आहे? याचा खुलासा खुद्द मिलिंदनं केला आहे. आपल्याला बॉलिवूडमध्ये कोणीही काम देत नाही, अशी खंत मिलिंदनं एका मुलाखतीदरम्यान व्यक्त केली. 'कोणताही सिनेनिर्माता मला सिनेमामध्ये घेऊ इच्छित नाही. यामागील कारण मला माहिती नाही, मात्र ही बाब खरी आहे'.

बाजीराव मस्तानी आणि शेफ सिनेमानंतर मिलिंद कोणत्या बॉलिवूड सिनेमात दिसला नाही. मिलिंद पुढे असंही म्हणाला की, ''सुरुवातीला माझ्याकडे सिनेमांच्या ऑफर्स येत होत्या, त्यावेळेस मी सिनेमांमध्ये कामही केलेले आहे.. भूमिका किती मोठी आणि लहान आहे हे महत्त्वाचं नाही. तुम्ही ती किती चांगल्या प्रकारे करतात हे महत्त्वाचं आहे. मला अॅक्टिंग करायला आवडते. या क्षेत्रात चांगलं मानधनदेखील मिळतं. शिवाय, मी चांगला अभिनय करतो, असं अनेकांनी म्हटलंदेखील आहे. बॉलिवूडमध्ये माझे चांगले संपर्क नाहीत. या क्षेत्रात माझे मित्र-मैत्रिणी नाहीत. प्रत्येक क्षेत्रात चांगले संपर्क असणं ही महत्त्वाची बाब असते. कदाचित म्हणून मला काम मिळत नसावं''. 

कोणत्या सिनेनिर्मात्यासोबत काम करायची इच्छा आहे, असे विचारले असता मिलिंद म्हणाला की, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मी कोणालाही चांगल्या प्रकारे ओळखत नाही. मी सिनेमेदेखील पाहत नाही. कदाचित याच कारणांमुळे मला सिनेमे मिळत नसावेत. ज्यांना अभिनय करायला आवडतो, मात्र सिनेमे पाहायला आवडत नाही, अशा लोकांच्या यादीत माझ्या नावाचा समावेश आहे. वर्षभरात मी जास्तीत जास्त तीन सिनेमे पाहतो, तेही सुपरहिरोंचा विषय असलेले सिनेमेच पाहतो.  

दरम्यान,  2015मध्ये मिलिंद सोमणनं वयाच्या 50व्या वर्षी 'आर्यन मॅन'चा किताब जिंकला. 'मेड इन इंडिया' या म्युझिक व्हिडीओमुळे मिलिंद प्रसिद्धीच्या झोतात आला. याव्यतिरिक्त त्यानं 'भेजा फ्राई', 'बाजीराव मस्तानी', 'शेफ', 'डेविड' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. शिवाय, 'कॅप्टन व्योम', 'नूरजहां' आणि 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाड़ी एक्स-3' यांसारख्या टीव्ही शोमध्येही तो झळकला आहे.

टॅग्स :मिलिंद सोमण बॉलिवूड