Join us  

Riteish Deshmukh : "...तर सर्वसामान्य माणसाने न्याय मागण्यासाठी जायचे कुठे?"; रितेश देशमुखने व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 11:03 AM

Actor Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. 

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील ललितपूर येथील एका 13 वर्षीय बलात्कार पीडितेवर पोलीस ठाण्याच्या प्रभारीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणीने आरोप केला आहे की, तिच्यावर चार जणांनी बलात्कार केला होता, त्यानंतर ती एका नातेवाईकासह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती. पीडिता पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेली असताना हा भयंकर प्रकार घडला. परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. याच दरम्यान अभिनेता रितेश देशमुखने (Actor Riteish Deshmukh) ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. 

"सर्वसामान्य माणसाने न्याय मागण्यासाठी जायचे कुठे? अशा लोकांना भरचौकात सर्वांसमोर मारायला पाहिजे" असं म्हणत संताप व्यक्त केला आहे. रितेश देशमुखने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ शेअर करत उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेबाबत भाष्य केलं आहे. "जर हे खरं असेल तर यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. जर रक्षकच भक्षक झाला तर सर्वसामान्य माणसाने न्याय मागण्यासाठी जायचे कुठे? अशा लोकांना भरचौकात सर्वांसमोर मारायला पाहिजे. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करत कठोरात कठोर शिक्षा द्या" अशी मागणी रितेशने आपल्या ट्विटमध्ये केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये नेमकं काय घडलं?

22 एप्रिलला एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून चार तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडिता पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास पोहोचली. मात्र, तिथे तिला न्याय मिळण्याऐवजी पुन्हा यातनांचा मिळाल्या. तिच्यावर पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार केला, असा आरोप अल्पवयीन मुलीने केला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपी पोलीस अधिकारी आणि इतर आरोपींना अटक करण्यासाठी  3 पोलीस पथके तयार करण्यात आली आहे. पीडितेने या घटनेची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलीस अधिकाऱ्याला अद्याप अटक झालेली नाही. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून तो फरार आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेनंतर आरोपी अधिकारी असलेल्या स्टेशन हाऊस ऑफिसर टिळकधारी सरोज याला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो फरार असून तीन पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत, असे ललितपूरमधील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अन्य तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या सर्व पोलिसांना कर्तव्यावरून हटवण्यात आले आहे. डीआयजी दर्जाचा अधिकारी या प्रकरणाची चौकशी करेल आणि 24 तासांत अहवाल सादर करणार आहे . 

टॅग्स :रितेश देशमुखउत्तर प्रदेशगुन्हेगारी