Join us  

 ‘मुळशी पॅटर्न’चा पिट्या भाई रंगवतोय मडकी, बोळकी; मदतीला पोहोचले प्रवीण तरडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 8:00 AM

Pravin Tarde : व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, दोस्त असावा तर असा

ठळक मुद्दे वर्षभरापूर्वी प्रवीण तरडेच्या शेतात भात लावणी सुरू होती त्यावेळी रमेश परदेशीने शेती कामात मदत केली होती. शिवाय या जिगरी यारांनी   एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला होता. 

ग्लॅमर इंडस्ट्रीत सच्ची मैत्री तशी दुर्मिळ. पण अपवाद आहेतच. अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde)आणि ‘मुळशी पॅटर्न’चा पिट्या भाई यांची मैत्री अशीच सच्ची आणि नि:स्वार्थ. रमेश परदेशी (Ramesh Pardeshi ) याने ‘मुळशी पॅटर्न’ या गाजलेल्या चित्रपटात पिट्या भाईची भूमिका साकारली आहे.  देऊळबंद, फत्तेशीकस्त, बेरीज वजाबाकी अशा आणखी काही चित्रपटातून त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.  रमेश परदेशी आणि प्रवीण तरडे यांची मैत्री अगदी बालपणापासूनची. आजही त्यांची मैत्री तशीच कायम आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही याची खात्री पटेल.

होय, प्रवीण तरडे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात  प्रवीण तरडे रमेश परदेशी यांच्या घरी जाऊन त्यांच्या पारंपरिक व्यवसायात मदत करताना दिसत आहेत.   मित्राला त्याच्या पारंपरिक व्यवसायात मदत केलीच पाहिजे.. जसं माझ्या गावाला शेताची कामं असतात.भात लावायला किंवा काढायला  येतो त्यावेळी पिट्या स्वत:हून येतो. पिट्याचा रांजण, कुंड्या, मडकी,  बोळकी, किल्ले बनवून ते रंगवणे हा पारंपरिक व्यवसाय आहे. पौंड फाट्यावर  पिट्याचे जुनं मोठं घर आहे. तिथे तो दरवर्षी हे काम करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी येतो. मी देखील त्याच्या या पारंपरिक व्यवसायाला नेहमी मदत करायला येतो.  आम्ही दुसरी तिसरी इयत्तेत शिकायला होतो त्यावेळी देखील मी पिट्याला या कामात मदत करायला यायचो, असं प्रवीण तरडे यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे. परंपरागत व्यवसाय टिकलेच पाहिजेत असे म्हणून प्रवीण तरडेने रमेश परदेशीला या पारंपरिक व्यवसायाला शुभेच्छाही दिल्या आहेत. प्रवीण तरडे हे किती मोठे नट आहेत, हे नव्यानं सांगायला नकोच. पण त्यांच्या वागण्याबोलण्यात कुठलाही अविर्भाव नाही. आपल्या मित्रासोबतची जपलेली त्यांची मैत्री निश्चितपणे कौतुकास्पद आहे.   वर्षभरापूर्वी प्रवीण तरडेच्या शेतात भात लावणी सुरू होती त्यावेळी रमेश परदेशीने शेती कामात मदत केली होती. शिवाय या जिगरी यारांनी   एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला होता. 

टॅग्स :प्रवीण तरडे