परेश रावल हे बॉलिवूडमधील संवेदनशील अभिनेते. परेश यांना आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. परेश यांनी 'हेरा फेरी', 'फिर हेरा फेरी', 'हंगामा', 'हलचल' अशा सिनेमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. तर दुसरीकडे 'वास्तव', 'ओह माय गॉड' ते नुकताच रिलीज झालेला 'द स्टोरीटेलर' सारख्या सिनेमांमधून परेश रावल यांनी संवेदनशील भूमिकाही साकारल्या. परेश रावल यांनी नुकतंच एका मुलाखतीत बॉलिवूड रिमेकवर नाराजी दर्शवली आहे.
आम्ही चोरीचा माल उचलतो- परेश रावलपरेश रावल यांनी सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "मी या गोष्टीचा अनुभव घेतलाय. जेव्हा तुम्ही कोणत्यातरी दिग्दर्शकाला भेटायला जाता आणि त्यांना सांगता की तुम्हाला सिनेमा बनवायचा आहे. तेव्हा तो तुम्हाला धुळीत पडलेली एक कॅसेट देतो आणि सांगतो की, हे बघून ठेव. मग नंतर आपण याला मिक्स करु. आपण चोरीचा माल उचलतो. आम्ही हुशार चोर आहोत. आम्ही परदेशी सिनेमा चोरी करायचो. जेव्हा त्यांचं ऑफिस इथे उघडलं तेव्हा त्यांच्या सिनेमांसाठी पैसे द्यावे लागायचे. त्यानंतर सर्वांनी विचार केला की असं करायला नको कारण यात कोणताच फायदा नाही."
"तेव्हा सर्वांना कळलं की त्यांची गोष्ट किती सशक्त आहे. त्यांच्या कहाणीत किती नाविन्य आहे. ती कहाणी स्ट्राँग, नाट्यमयी आणि कल्पक असते. आधी फक्त जी कहाणी चोरलीय त्यावरच काम व्हायचं. त्यावेळी एक आळस आणि वैचारीक दारिद्र्य होतं. जेव्हा ते स्वतः वेगळ्या गोष्टींवर मेहनत करु लागले तेव्हा त्यांना समजलं की आता चोरीचा माल घेऊ नये." अशाप्रकारे परेश रावल यांनी बॉलिवूडमध्ये जे रिमेक बनतात त्यावर ताशेरे ओढले. परेश लवकरच अक्षय कुमार, तब्बू यांच्या 'भूत बंगला' सिनेमात काम करणार आहेत. २ एप्रिल २०२६ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.