Join us  

अभिनेता गोविंदाचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश; करिष्मा, करिना कपूरही CM शिंदेंच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 4:22 PM

महायुतीकडून गोविंदाला या मतदारसंघात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याआधीही गोविंदाने खासदार म्हणून काम केले आहे. 

मुंबई - अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे. गोविंदाच्या पक्षप्रवेशाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी अभिनेता गोविंदा याने शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार असल्याची माहिती आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून गोविंदाला लोकसभेची उमेदवारी मिळणार अशी चर्चा आहे. 

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून ठाकरेंनी अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून संजय निरुपम हेदेखील इच्छुक होते. परंतु ठाकरेंनी उमेदवारी घोषित केल्यानंतर निरुपम यांची नाराजी पाहायला मिळाली. त्यात आता गोविंदा शिवसेनेत दाखल होत असल्याने महायुतीकडून गोविंदाला या मतदारसंघात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याआधीही गोविंदाने खासदार म्हणून काम केले आहे. 

गोविंदाने उत्तर मुंबईच्या जागेवर २००४ साली भाजपाच्या राम नाईक यांचा पराभव करून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यामुळे गजानन किर्तीकरांच्या जागेवर गोविंदा यांना शिवसेनेकडून संधी दिली जाईल असंही बोलले जात आहे. या मतदारसंघात उत्तरेकडील लोकांची संख्या जास्त आहे. त्यात सिनेकलाकार म्हणून गोविंदा यांना इथं फायदा होऊ शकतो. त्यात महायुतीचे पाठबळ मिळालं तर गोविंदा यांना चांगली मते पडतील अशीही चर्चा महायुतीच्या नेत्यांमध्ये आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात २००४ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून गोविंदाला उभं केले होते. त्यावेळी पाच वेळा खासदार राहिलेल्या राम नाईकांचा पराभव करून गोविंदा जायंट किलर ठरला होता. गोविंदाने राम नाईकांना ४८ हजार मतांनी हरवलं होते. 

करिना कपूर, करिष्मा कपूरही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री करिष्मा कपूर आणि करिना कपूर यादेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी वर्षावर पोहचले. त्यामुळे करिना, करिष्मा शिवसेनेत प्रवेश करणार का अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४गोविंदाएकनाथ शिंदेकरिना कपूरशिवसेना