Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेते देवेन वर्मा यांचे निधन

By admin | Updated: December 3, 2014 03:31 IST

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेते देवेन वर्मा (७८) यांचे मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने कल्याणीनगरमधील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले

पुणे : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेते देवेन वर्मा (७८) यांचे मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने कल्याणीनगरमधील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्याच्या मागे पत्नी रुपा वर्मा व दोन बहिणी असा परिवार आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे व वयोमानामुळे त्यांनी अलिकडील काळात अभिनय करणे बंद केले होते. मागील अनेक वर्षांपासून ते पुण्यातच स्थायिक झाले होते. त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता. पत्नी रुपा वर्मा या दिवंगत अभिनेते अशोक कुमार यांच्या कन्या आहेत.
अशोक कुमार यांचा मुलगा अरुप कुमार, आत्मचरित्रकार सुभाषचंद्र जाधव यांच्यासह मोजक्या आप्तेष्टांसह देवेन वर्मा यांच्यावर दुपारी येरवड्याच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मराठी अथवा हिंदी चित्रपटसृष्टीतील एकही मान्यवर उपस्थित नव्हता.
त्यांचा जन्म २३ आॅक्टोबर १९३७ रोजी मुंबईत झाला होता. नंतर त्यांचे कुटुंबीय पुण्यात स्थायिक झाले. पुण्यातील नौरोसजी वाडीया महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी वर्गमित्र असलेल्या इनॉक डॅनिअल व याकुब सईद यांच्याबरोबर काम करण्यास सुरुवात केली. डॅनिअल यांच्या आर्केस्ट्राची जबाबदारी पाहण्याचे काम वर्मा यांच्यावर होते.