Join us  

'ग्रँड मस्ती' फेम अभिनेत्याची ऑनलाइन फसवणूक, दीड लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 4:20 PM

Aftab shivdasani: फसवणूक झाल्याचं लक्षात येताच अभिनेत्याने पोलिसांत धाव घेतली.

सध्याच्या काळात प्रत्येक जण सर्रास ऑनलाइन सेवांचा वापर करत असतो. अगदी शॉपिंग करण्यापासून ते वीजेचं बील वगैरे भरेपर्यंत प्रत्येक जण आज ऑनलाइन सेवासुविधांचा वापर करतो. मात्र, यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये सायबर क्राइममध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. यामध्येच बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी हा सायबर क्राइमला बळी पडला आहे. आफताबची ऑनलाइन फसवणूक झाली असून त्याला लाखोंचा गंडा घातला गेला आहे.

बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी याची काही सायबर चोरांनी फसवणूक केली असून त्याच्या खात्यातून तब्बल दीड लाख रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली आहे. या प्रकरणी त्याने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

कशी झाली आफताबची फसवणूक?

आफताबच्या मोबाईल क्रमांकावर एक मेसेज आला होता. ज्यात त्याच्या AXIS बँकेचं खातं आज बंद होणार असं म्हटलं होतं. त्यामुळे हे खातं सुरु ठेवण्यासाठी पॅनकार्ड अकाऊंटसोबत लिंक करा असं सांगण्यात आलं. सोबतच एक लिंक सुद्धा दिली होती. या लिंकवर आफताबने क्लिक केलं. त्यानंतर एका व्यक्तीचा त्याला फोन आला. ही व्यक्ती AXIS बँकेची कर्मचारी असल्याचं त्याला सांगण्यात आलं. विशेष म्हणजे आफताबनेही या व्यक्तीवर विश्वास ठेवत त्याच्यासोबत काही डिटेल्स शेअर केले. सोबतच या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे त्याने दिलेल्या लिंकमध्ये मोबाईल क्रमांक आणि पीन टाकला ज्यानंतर त्याच्या खात्यातून तब्बल १ लाख ४९ लाख रुपये इतकी रक्कम काढण्यात आली.

खात्यातून अचानक एवढी रक्कम गेल्यामुळे आफताबने बँकेतील एका कर्मचाऱ्याशी संवाध साधला. यावेळी या कर्मचाऱ्याने तुमची फसवणूक झाल्याचं सांगत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. या प्रकारानंतर त्याने वांद्र्यातील पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत दोन आज्ञातांविरोधात आयपीसीच्या कलम ४१९ तसंच ४२० आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (सी) आणि ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :आफताब शिवदासानीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा