अभिनेता अभिजीत खांडकेकरने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. अभिजीत सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. तो सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. नुकतीच त्यानं एक भावनिक पोस्ट शेअर करत खास अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
अभिजीत खांडकेकरनं नागपूरमध्ये पार पडलेल्या 'अभंगवारी' या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी सांभाळली. हा कार्यक्रम त्याच्यासाठी केवळ एक निवदेन नाही, तर त्याचं संपूर्ण मन आणि आत्मा व्यापून टाकणारा आध्यात्मिक अनुभव ठरला. तो अनुभव त्यानं शब्दात उतरवलाय. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यानं लिहलं, "सुखाचे जे सुख... करीन करीन म्हणत वारी घडली नव्हती, अखेर तो अनुभव घेतला. म्हणायला कार्यक्रम- पण गायक, श्रोते अस काही नाहीच. हे ही गातायत ते ही गातायत, हजारो मुखांनी एकत्रीत जयघोषाचा नाद, सुगंधी वातावरण, भारावून टाकणारे स्वर, सगळंच मंत्रमुग्ध करणार. स्टँडिंग ओव्हेशन नाही जणू ठेका धरून नाचायला आसुसलेले पाय जायला तयारच नव्हते. कर्टेन कॉल कसला, पुन्हा पुन्हा डोळे भरून पाहायची इच्छा, अजूनही कान तृप्त करून घेण्याचा अट्टाहास".
पुढे लिहलं, "जो येतोय तो डोळे भरून बघतोय, सेल्फी नकोतच कोणाला, एक कुटुंबाने पायच धरले, म्हटलं अहो माझ्या का पाया पडताय? "तुमच्या मुळे वारी घडली हो, नको व्हय मंग…" मी निशब्द. हे सगळं गारुड महेश काळे यांचं. विठ्ठल भक्तीच्या सुरात सगळ्यांना चिंब भिजवणाऱ्या ह्या स्रोताच्या शेजारी बसून स्वतः नखशिखांत भिजून हा अत्यंत विनम्र करणारा अनुभव मी घेतला . महेश आपले सगळे संकल्प पूर्ण होवोत", असं अभिनेत्यानं म्हटलं. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय.
अभिजीतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे. 'चला हवा येऊ द्या- कॉमेडीच गँगवॉर' २६ जुलै पासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता झी मराठीवर पाहायला मिळेल.