टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं ३१ ऑगस्ट रोजी निधन झालं. प्रियाचा कॅन्सरने मृत्यू झाला. प्रियाचं असं अचानक जाणं सर्वांनाच चटका लावून गेलं. गेल्या दोन वर्षांपासून ती स्क्रीनवरुन गायब होती. प्रिया इतक्या कठीण काळातून जात आहे याची मोजक्या लोकांनाच कल्पना होती. 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत प्रिया शेवटची दिसली. अभिजीत खांडकेकर यामध्ये तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता. नुकतंच अभिजीत प्रियाविषयी बोलताना भावुक झाला.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत खांडकेकर म्हणाला, "याबद्दल आज असं बोलावं लागेल याची मी कल्पनाही केली नव्हती. गेल्या दीड वर्षात तिला हा आजार झाला आणि कॉम्प्लिकेशन सुरु झाले. तिचे कुटुंबीय आणि खूप मोजक्या लोकांना याबद्दल माहिती होती. त्यापैकी मीही होतो. आम्ही खूप चांगले मित्र होतो. तिची तब्येत ढासळत जाईल आणि एक दिवस अशी बातमी येईल याची कल्पना असूनही आपल्या मनाला ते पटत नसतं. अजूनही विश्वास बसत नाही. आदल्याच दिवशी मी तिला मेसेज केला होता. त्याआधी आमचं बोलणं व्हायचं. ती कोणालाही भेटायला तयार नव्हती. तिची इच्छाच नव्हती. पण तरीसुद्धा मी मित्र हट्टीपणा करतात तसं तिला विनंती करत होतो की मी येतो. बोलू नकोस पण मला एकदा येऊन भेटू दे. पण देवाच्या मनात असतं ते होतं आणि कोणी बदलू शकत नाही. हे तथ्य आपल्याला मान्य करावं लागेल."
तो पुढे म्हणाला, "मालिकेवेळी आम्ही एकत्र वेळ घालवला. सेटवर ती अगदी लहान मुलीसारखीच होती. आम्ही इतकं काम केलं. इव्हेंट्स केले. एकमेकांसोबत गाड्या शेअर करणं, खाणंपिणं, गप्पा मारणं असं सगळंच केलं. आपल्यासमोर असं जवळच्या माणसाची तब्येत ढासळणं हे चटका लावणारं आहे."