Join us

'मुरांबा'मध्ये रमा-अक्षयच्या नात्यात नवा ट्विस्ट, या अभिनेत्याची होणार मालिकेत एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:39 IST

Muramba Serial : 'मुरांबा' मालिकेचे कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचले आहे. रमासारखीच हुबेहुब दिसणारी माही सध्या मालिकेत दिसत असल्यामुळे कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होत आहे.

 स्टार प्रवाह (Star Pravah)च्या 'मुरांबा' (Muramba Serial) मालिकेचे कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचले आहे. रमासारखीच हुबेहुब दिसणारी माही सध्या मालिकेत दिसत असल्यामुळे कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होत आहे. लवकरच मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. साईनाथ शेवलकर असे या पात्राचे नाव असून अभिनेता सिद्धार्थ खिरीड (Siddharth Khirid) हे पात्र साकारणार आहे.

साईनाथ हे पात्र अतिशय वेगळे आहे. मुळचा चंद्रपुरचा असणार साईनाथ पर्यटकांना गाड्या पुरवण्याचे काम करतो. पर्यटकांना ताडोबाच्या जंगलात घेऊन जातो. विदर्भीय भाषा बोलतो. तसा शांत स्वभावाचा आहे. कोणाच्या अध्यात मध्यात नसतो. पण कोणी त्याला चुकीचे वाटेल असे बोलले तर अचानक भडकतो. मरणासन्न अवस्थेत जेव्हा साईनाथला रमा दिसते तेव्हा तो देवदुतासारखा धावून येतो आणि तिचा जीव वाचवतो. साईनाथच्या एण्ट्रीने मालिकेतली रंगत द्विगुणीत होणार आहे.

सिद्धार्थ म्हणाला, ''स्टार प्रवाहसोबत खूप जुने नाते आहे. मुलगी झाली हो मालिकेनंतर जवळपास तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाह परिवारात सामील होण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे. या मालिकेच्या निमिताने विदर्भीय भाषा शिकण्याची संधी मिळाली. ही नवी भाषा आत्मसात करताना माझा कस लागतो आहे. मात्र सेटवर सर्वांच्या मदतीने मी या पात्राला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे. मालिकेची टीम खूप छान आहे. सेटवर खूप छान पद्धतीने सर्वांनीच मला आपलेसे करुन घेतले आहे.''

टॅग्स :स्टार प्रवाह