आसामचे लोकप्रिय आणि ईशान्येकडील राज्यांचा आवाज मानले जाणारे गायक जुबिन गर्ग यांच्या कथित अपघाती मृत्यूला आता एक मोठे आणि गंभीर वळण मिळाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी थेट विधान केले आहे की, जुबिन गर्ग यांचा मृत्यू सामान्य अपघात नसून त्यांची "हत्या" करण्यात आली आहे.
१९ सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी गेलेल्या जुबिन गर्ग यांचा बुडून मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त होते. सिंगापूर प्रशासनाने आणि अधिकृत शवविच्छेदन अहवालातही मृत्यूचे कारण 'पाण्यात बुडणे' असे नोंदवले होते. मात्र, जुबिनच्या चाहत्यांनी आणि कुटुंबियांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे असम सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
मुख्यमंत्री सरमा यांनी हे स्पष्ट केले आहे की, "ज्यांनी जुबिन गर्ग यांची हत्या केली आहे. त्यांना कायद्याच्या तावडीतून सुटता येणार नाही." याप्रकरणी आसाम सरकारने तातडीने विशेष तपास पथक आणि एका सदस्यीय न्यायिक आयोग नेमला आहे.
तपासामध्ये आतापर्यंत अनेक मोठे खुलासे झाले असून, पोलिसांनी याप्रकरणी कार्यक्रमाचे आयोजक श्यामकानू महांता आणि जुबिनचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा यांच्यासह एकूण सात लोकांना अटक केली आहे. याशिवाय, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १.१ कोटी रुपयांपेक्षा अधिक संशयास्पद रक्कम आढळल्यानंतर आता आर्थिक तपास यंत्रणांनीही या प्रकरणाच्या तपासात उडी घेतली आहे.
सिंगापूर पोलीस अजूनही या घटनेला अपघात मानत असले तरी, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी 'ही हत्याच आहे' असे सांगत होते. लवकरच न्यायालयात चार्जशीट दाखल करण्याची ग्वाही दिली आहे. या धक्कादायक दाव्यामुळे आसामच्या राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.