Join us

बॉम्बने उडवून टाकेन! सलमानला धमकावणाऱ्याला मुंबई पोलिसांनी शोधून काढलं; समोर आली मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 23:06 IST

Salman Khan Death Threat Case: अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. वरळी वाहतूक ...

Salman Khan Death Threat Case: अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. वरळी वाहतूक नियंत्रण कक्षाला सलमान खानवर हल्ला करणार असल्याचा मेसेज आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला होता. वरळी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यानंतर आता २४ तासांच्या आत मुंबई पोलिसांनी सलमानला धमकावणाऱ्याला शोधून काढलं आहे.

वरळी वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला व्हॉट्सअप नंबरवर धमकीचा मेसेज आला होता. बॉम्बने सलमान खानची गाडी उडवून देऊ त्याबरोबरच सलमानला घरात घुसून मारू, अशी धमकी व्हॉट्सअप मेसेजमध्ये देण्यात आली. त्यानंतर  वरळी पोलिसांना याप्रकरणी मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली.

या प्रकरणात, मुंबई पोलिसांनी सलमान खानला धमकावणाऱ्याची ओळख पटवली आहे. ज्या नंबरवरुन सलमान खानसाठी धमकी आली होती तो हा नंबर गुजरातमधील वडोदराजवळील एका गावातील एका २६ वर्षीय तरुणाचा असल्याचे समोर आले आहे. वरळी पोलिसांनी त्या व्यक्तीला चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याला २-३ दिवसांत वरळी पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. सलमानला धमकावणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. वरळी पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

दरम्यान, यापूर्वीही सलमान खानला अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. गेल्या काही वर्षांत, लॉरेन्स बिश्नोई गँगकडून त्याला अनेक वेळा धमक्या देण्यात आल्या आहेत. १९९८ च्या काळवीट शिकार प्रकरणावरून बिश्नोई गँग सलमानच्या मागे लागली आहे. गेल्यावर्षी सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि त्याला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.

टॅग्स :सलमान खानमुंबई पोलीस