Join us

अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 10:50 IST

याआधी अभिनेता सलमान खान याच्यावरही हल्ल्याची बातमी देणारा कॉल पोलिस कंट्रोल रूमला आला होता.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफला जीवे मारण्याच्या आरोपाखाली खार पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीने टायगरला मारण्यासाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा केला होता. खोटी बातमी पसरवणारा हा आरोपी मूळचा पंजाबचा रहिवासी आहे. या आरोपीचं नाव मनिष सुजिंदर सिंग असं असल्याचं समोर आले आहे.

मनिष सिंगने सोमवारी मुंबई पोलिस कंट्रोल रूमला फोन केला होता. त्यात त्याने सांगितले की, सिक्युरिटी कंपनी ट्रिगचे काही लोक अभिनेता टायगर श्रॉफची हत्या करणार आहेत. इतकेच नाही तर आरोपी मनिष कुमारने पोलिसांकडे दावा करत टायगर श्रॉफच्या हत्येसाठी मला शस्त्रे आणि २ लाख रूपये सुपारीही दिली होती असं सांगितले आहे. पोलिसांना आलेल्या या कॉलनंतर अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत पुढील कार्यवाही सुरू केली. 

पोलिसांनी याचा तपास सुरू केला तेव्हा ही बातमी खोटी असून मनिष सिंगने चुकीची माहिती दिल्याचं उघड झाले. खार पोलिसांनी या प्रकरणी मनिष सिग याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याआधी अभिनेता सलमान खान याच्यावरही हल्ल्याची बातमी देणारा कॉल पोलिस कंट्रोल रूमला आला होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

टायगर श्रॉफ हा अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा असून हिरोपंती या सिनेमातून टायगरने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. त्यानंतर टायगर बागी, ए फ्लाईंग जेट, मुन्ना मायकर, वेलकम टू न्यूयॉर्क, बागी २, स्टुडेंट ऑफ द इयर २, बागी ३, हिरोपंती २, गणपथ सारख्या सिनेमात नजरेस आला. २०२४ मध्ये टायगर बडे मिया, छोटे मिया या सिनेमात झळकला. त्यात अक्षय कुमारसोबत टायगरने काम केले परंतु हा सिनेमा फारसा चालला नाही. सिंघम अगेन सिनेमातही टायगरने भूमिका केली.  

टॅग्स :टायगर श्रॉफमुंबई पोलीस