Join us

अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 15:43 IST

Bloomberg Billionaires Index : या कंपनीचे नागपूर येथे मुख्यालय आहे. या कंपनीच्या कामगिरीने अध्यक्षांच्या संपत्तीत तब्बल ७८ टक्के वाढ झाली आहे.

Bloomberg Billionaires Index : भारतात असे अनेक उद्योगपती आहेत जे त्यांच्या कर्तृत्वाने जगाचे लक्ष वेधून घेतात. पण या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी ते जून), एका उद्योजकाने कमाईच्या बाबतीत देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनाही मागे टाकले आहे! जागतिक पातळीवर अनेक उलथापालथी सुरू असतानाही, या अब्जाधीशांच्या संपत्तीत तब्बल ७८% वाढ झाली आहे. हे नाव आहे - सत्यनारायण नुवाल, जे सोलर इंडस्ट्रीज इंडियाचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.

७८% वाढीसह नुवाल यांनी मारली बाजीब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या अहवालानुसार, या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सत्यनारायण नुवाल यांच्या संपत्तीत ७८% ची जबरदस्त वाढ झाली आहे. यामुळे त्यांची एकूण संपत्ती आता ७.९० अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, त्यांची कंपनी सोलर इंडस्ट्रीज इंडिया, डिटोनेटर्स, स्फोटके आणि दारूगोळा बनवते आणि या कंपनीचे मुख्यालय आपल्या महाराष्ट्रातील नागपूर येथे आहे.

सोलर इंडस्ट्रीजचे शेअर्स २०२४ मध्ये ४५% नी वाढले होते, तर दोन वर्षांपूर्वी २०२३ मध्ये ते ५४% नी वाढले होते. यावर्षी (२०२५ मध्ये) तर कंपनीच्या शेअर्समध्ये ८१% ची मोठी वाढ दिसून येत आहे, ज्यामुळे नुवाल यांच्या संपत्तीत विक्रमी वाढ झाली आहे.

इतर उद्योगपतींची कामगिरीसत्यनारायण नुवाल यांच्या तुलनेत इतर प्रमुख उद्योगपतींच्या संपत्तीतही वाढ झाली आहे, पण ती नुवाल यांच्या वाढीव दरापेक्षा कमी आहे.

  1. सत्यनारायण नुवाल: एकूण संपत्ती ७.९ अब्ज डॉलर्स (७८.४% वाढ)
  2. सुनील मित्तल: एकूण संपत्ती ३०.४ अब्ज डॉलर्स (२७.३% वाढ)
  3. लक्ष्मी मित्तल: एकूण संपत्ती २४.८ अब्ज डॉलर्स (२६.१% वाढ)
  4. राहुल भाटिया: एकूण संपत्ती १०.८ अब्ज डॉलर्स (२४.९% वाढ)
  5. मुकेश अंबानी: एकूण संपत्ती ११०.५ अब्ज डॉलर्स (२१.९% वाढ)
  6. गौतम अदानी: एकूण संपत्ती ८५.४ अब्ज डॉलर्स (८.५% वाढ)

वाचा - इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!

या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, या वर्षाच्या सुरुवातीपासून सत्यनारायण नुवाल यांनी त्यांच्या संपत्तीत केलेली वाढ ही इतर कोणत्याही मोठ्या भारतीय उद्योगपतीपेक्षा खूप जास्त आहे, ज्यामुळे ते या वर्षातील सर्वात मोठे 'वेल्थ क्रिएटर' (संपत्ती निर्माण करणारे) ठरले आहेत. 

टॅग्स :अदानीमुकेश अंबानीनागपूरशेअर बाजारऑपरेशन सिंदूर