Join us  

Zomato चे सह-संस्थापक गौरव गुप्ता यांचा पदावरून तडकाफडकी राजीनामा; शेअर्समध्ये मोठी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 1:30 PM

वाचा काय आहे प्रकरण. काही दिवसांपूर्वीच Zomato नं आणला होता आपला IPO.

ठळक मुद्देवाचा काय आहे प्रकरण. काही दिवसांपूर्वीच Zomato नं आणला होता आपला IPO.

होम डिलिव्हरी करणाऱ्या Zomato या कंपनीमधून एक मोठी बातमी आता समोर आली आहे. झोमॅटोचे सह-संस्थापक गौरव गुप्ता (Zomato Co-Founder Gaurav Gupta) यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २०१५ मध्ये झोमॅटोत सामील झालेल्या गुप्ता यांच्याकडे २०१८ मध्ये कंपनीच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर या पदाची जबाबदारी देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच कंपनीनं आपला आयपीओ (IPO) बाजारात आणला होता. या आयपीओमागील गुप्ता हे मुख्य चेहरा होता. तसंच ते गुंतवणूकदार आणि माध्यमांसोबत प्राधान्यानं चर्चेत सामीलही झाले होते.

गौरव गुप्ता यांनी कंपनी सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. कंपनीचे संस्थापक दीपेंद्र गोयल आणि कंपनीचे सह-संस्थापक गौरव गुप्ता यांच्यादरम्यान मतभेद निर्माण झाले होते. तसंच गौरव गुप्ता यांनी सुरू केलेले सर्व व्यवसाय जवळपास बंद झाले आहेत. यामागे गौरव गुप्ता यांनी सुरू केलेले व्यवसाय चांगली कामगिरी करत नसल्याचं सांगण्यात येत आहे, असं वृत्त मनी कंट्रोलनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. नुकताच झोमॅटोनं ग्रॉसली डिलिव्हरी सेवा आणि न्युट्रास्युटिकल व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतरच काही दिवसांत गुप्ता यांच्या राजीनाम्याचं वृत्त समोर आलं आहे. Zomato नं गेल्या वर्षी आरोग्य आणि फिटनेस संबंधी उत्पादनांच्या लाँचसह न्यूट्रास्युटिकल व्यवसायातही पाऊल ठेवलं होतं."झोमॅटोला पुढे नेण्यासाठी आता एक उत्तम टीम आहे आणि माझ्या प्रवासात पर्यायी मार्ग स्वीकारण्याची आता वेळ आली आहे. मी हे लिहित असताना मी खूप भावुक झालो आहे आणि माझ्या मनात आता काय भावना आहेत हे मला शब्दांद्वारे मांडता येणार नाहीत," असं गुप्ता यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या इमेलमध्ये म्हटलं आहे. 

दीपेंद्र गोयल यांनी आपले मित्र पंकज चढ्ढा यांच्यासोबक एकत्र येत Zomato ची सुरूवात केली होती. ही ऑनलाईन फूड डिलिव्हरी केवळ आशियातीलच नाही तर संपूर्ण जगातील मोठी कंपनी ठरली आहे. दीपेद्र गोयल यांनी आयआयटीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनादेखील खाण्याची मोठी आवड होती. या आवडीतून त्यांनी झोमॅटोचं आपलं स्वप्न साकार केलं. अगदी साधेपणानं त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरूवात केली होती. परंतु त्यांच्या कल्पनेपेक्षाही अधिक ट्रॅफिक त्यांच्या वेबसाईटवर येऊ लागला होता. यानंतर त्यांनी आपल्या मित्रासह २००८ मध्ये फुडी ईबे ही डॉट कॉमची सुरूवात केली. ही वेबसाईट लाँच झाल्यानंतर दीपेद्र यांच्यासाठी नवे रस्तेही उघडले. त्यांनी आपल्या कार्यालयाच्या आजूबाजूला असलेल्या हॉटेल्सनाही आपल्याशी जोडण्यास सुरूवात केली होती.

टॅग्स :झोमॅटोइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारपैसाभारतऑनलाइनअन्न