Join us  

60 हजार अंशांच्या प्रवासाला लागली 36 वर्षे, विविध प्रकारच्या अडथळ्यांवर यशस्वी मात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 11:04 AM

सेन्सेक्सने ५० ते ६० हजार या १० हजार अंशांचा टप्पा अवघ्या नऊ महिन्यांमध्ये पार केला आहे.

प्रसाद गो. जोशी -नाशिक : मार्गात आलेले विविध अडथळे यशस्वीरित्या पार करीत मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने ६० हजार अंशांचा टप्पा पार केला आहे. १ जानेवारी, १९८६ रोजी सुरू झालेल्या या निर्देशांकाने ३६ वर्ष ९ महिन्यांमध्ये ६० हजारांचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे यापैकी शेवटच्या १० हजार अंशांचा टप्पा हा अवघ्या ९ महिन्यात पार झाला असून ही वाटचाल सर्वात वेगवान ठरली आहे.

अवघ्या नऊ महिन्यांत दहा हजारी मजल -सेन्सेक्सने ५० ते ६० हजार या १० हजार अंशांचा टप्पा अवघ्या नऊ महिन्यांमध्ये पार केला आहे. २१ जानेवारी, २०२१ रोजी निर्देशांक ५० हजार झाला. त्यानंतर अवघ्या नऊ महिन्यात आणि १६७ सत्रांमध्ये निर्देशांकाने १० हजार अंशांचा टप्पा पार केला आहे. 

निर्देशांकाचा हा सर्वात वेगवान प्रवास ठरला आहे. या काळात विविध कंपन्यांनी वाढीला हातभार लावला असला तरी पहिल्या पाच कंपन्यांमध्ये दोन बिगर बँकींग वित्तसंस्था, एक स्टील कंपनी, एक सरकारी बँक आणि एक माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे. 

निर्देशांकाने १० ते २० हजार अंशांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी ४३३ सत्रे घेतली. त्यानंतरच्या २० ते ३० हजार अंशांच्या टप्प्यासाठी सर्वाधिक काळ लागला. या दहा हजारी प्रवासाला १८२३ सत्रांचा कालावधी लागला. ३० ते ४० हजारांसाठी १०४५ सत्रे लागली. ४० हजार अंशांनंतर मात्र बाजाराला चांगलाच वेग आला. त्यानंतरचा १० हजारी टप्पा ४२३ सत्रांमध्ये पार झाला आहे. १ जानेवारी, १९८६ रोजी सर्वप्रथम संवेदनशील निर्देशांक जाहीर झाला आणि अव्याहतपणे त्याचा प्रवास सुरू आहे.

या निर्देशांकाला पहिले सहस्त्रक पूर्ण करायला साडेचार वर्षांचा काळ लागला. २५ जुलै, १९९० रोजी निर्देशांकाने १००० अंशांचा टप्पा गाठला आणि शेअर बााजरामध्ये अक्षरश: दिवाळी साजरी झाली. त्यानंतर बाजाराची वाटचाल आस्तेकदम सुरू होती.  

टॅग्स :निर्देशांकशेअर बाजारनिफ्टीनरेंद्र मोदीमनमोहन सिंगभाजपाकाँग्रेस