दहशत कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:26 AM2018-04-08T00:26:31+5:302018-04-08T00:26:31+5:30

मुंबईत गेल्या दोन वर्षांत सरासरी २५ ते ३० हजार भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. मात्र, भटक्या श्वानांची दहशत अद्याप कायम असून, कामावरून रात्री उशिरा घरी परतणारे मुंबईकर भटक्या श्वानांच्या दहशतीखाली आहेत.

 Panic Forever | दहशत कायमच

दहशत कायमच

- शेफाली परब

मुंबईत गेल्या दोन वर्षांत सरासरी २५ ते ३० हजार भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. मात्र, भटक्या श्वानांची दहशत अद्याप कायम असून, कामावरून रात्री उशिरा घरी परतणारे मुंबईकर भटक्या श्वानांच्या दहशतीखाली आहेत. त्यामुळे भटके श्वानच नव्हे, तर रस्त्यावरून फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या उपद्रवापासून मुंबईला मुक्त करण्यासाठी महापालिकेने पशुवैद्यकीय केंद्र उभारण्याची तयारी केली आहे. या अंतर्गत जास्तीतजास्त भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तीन वर्षांत ही मोहीम फत्ते करण्यात येणार आहे.
जानेवारी २०१४ मध्ये झालेल्या गणनेनुसार, मुंबईत ९५ हजार १७२ श्वान होते. मुंबईत सध्या १ लाख २ हजार ३७९ इतके श्वान आहेत. अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाने दिलेल्या निर्देशानुसार, दरवर्षी ३० टक्के कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी सहा संस्थांची नेमणूक करण्यात आली असून, वार्षिक २ कोटी ८७ लाख रुपये, याप्रमाणे कंत्राट कालावधीत या संस्थाना ८ कोटी ६१ लाख रुपये देण्यात येणार आहेत. मात्र, संस्थांमार्फत होणाºया या निर्बीजीकरण मोहिमेबाबत नगरसेवकांमध्येही साशंकताच आहे. त्यामुळे भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरण मोहिमेचा सखोल आढावा घेण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे.
या मोहिमेला अधिक गती देण्यासाठी महापालिकेने पशुवैद्यकीय केंद्राबरोबरचे ११ कायमस्वरूपी तर सात अंशकालीन पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याची तयारी केली आहे. अशी केंद्रे पश्चिम, मध्य आणि पूर्व उपनगरात स्थापन करण्यात येतील. प्रत्येक भटक्या श्वानाचे निर्बीजीकरण करण्याची खबरदारी या केंद्रात घेतली जाणार आहे. तर मोकाट जनावरांचे बस्तान मुंबईबाहेर हलविण्यात येणार आहे. यासाठी तीन निवारा गृह आणि मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष केंद्र प्रस्तावित आहे. भटक्या जनावरांना पकडण्यासाठी चार नवीन वाहने व बिगर शासकीय संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. मुंबईत जानेवारी २०१४ मध्ये केलेल्या गणनेनुसार ९५ हजार १७२ श्वान होते. मुंबईत सध्या १ लाख २ हजार ३७९ इतके श्वान आहेत. अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाने दिलेल्या निर्देशानुसार, दरवर्षी ३० टक्के कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी सहा संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे.

Web Title:  Panic Forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dogकुत्रा