नाशिक जिल्ह्यातील पाऊस बंद झाल्याने येथील जायकवाडी धरणातील पाण्याची आवक मंदावली असून रविवारी (दि.१३) सायंकाळी ६ वाजता धरणातील पाणीसाठा ७५.४२ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली.
जायकवाडी धरणात १ जुलैपासून पाण्याची आवक वाढली होती. या दिवशी धरणातील पाणीसाठा ४४.६४ टक्के होता. नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहिली होती.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देता येणार
• जायकवाडी धरणातील पाणीसाठा ७५ टक्क्यांच्या पुढे गेल्यामुळे शेतकऱ्यांना आता धरणातून सिंचनासाठी पाणी देता येणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील ५ जिल्ह्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
• खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांची मागणी आल्यास जायकवाडी धरणातून सिंचनासाठी पाणी सोडता येणार आहे, तसेच छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसीसह डीएमआयसी, तसेच इतर औद्योगिक क्षेत्रासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही पुढील दोन वर्षासाठी मिटला आहे.
हेही वाचा : गाजरगवताची ॲलर्जी झाल्यास काय कराल? कशी घ्याल काळजी; जाणून घ्या सविस्तर