Join us

गोदावरी नदीपात्र परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 10:14 IST

Jayakwadi Dam : नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने पैठण येथील जायकवाडी धरणात १६ हजार २९६ क्युसेकने पाण्याची आवक होत असून रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा ५०.५७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने पैठण येथील जायकवाडी धरणात १६ हजार २९६ क्युसेकने पाण्याची आवक होत असून रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा ५०.५७ टक्क्यांवर पोहोचला आहे. रात्रीतून पाण्याची आवक वाढणार आहे, असे शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी सांगितले.

मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असली तरी नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीपात्र परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने जायकवाडी धरणात पाण्याची गेल्या काही दिवसांपासून आवक वाढली आहे. १ जुलै रोजी ११ हजार १११ क्युसेक वेगाने पाण्याची आवक झाल्याने धरणातील पाणीसाठा ४४.६४ टक्क्यांवर पोहोचला होता. त्यानंतर पाण्याची आवक मंदावली होती.

आता पुन्हा दोन दिवसांपासून पाण्याची आवक वाढली आहे. रविवारी धरणात १६ हजार २९६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळे सायंकाळी धरणातील पाणीसाठा ५०.५७टक्क्यांवर पोहोचला आहे. जायकवाडी धरणाची पाणी पातळी १०९७.७८५ दलघमी एवढी असून एकूण पाणीसाठा १८३५.७८५ दलघमी आहे. मागील वर्षी याच दिवशी येथे केवळ ४.१३ टक्के पाणीसाठा होता.

गतवर्षी १०० टक्के भरले होते धरण

मागील वर्षी जायकवाडी धरणाची पाणी पातळी ९७.५२ टक्के पोहोचल्यावर ९ सप्टेंबर रोजी रोजी धरणाचे ६ दरवाजे अर्ध्या फुटाणे उंचावून ३ हजार १४४ क्युसेकने पाण्याचा गोदावरी नदीत विसर्ग करण्यात आला होता. मागील वर्षी १५ ऑक्टोबर रोजी जायकवाडी धरण १०० टक्के भरले होते. त्यानंतर धरणाच्या २७ दरवाजांमधून सात वेळेस ३०.४७ टीएमसी पाणी गोदापात्रात सोडण्यात आले होते.

हेही वाचा : जांभूळ शेतीतून लाखोंची लॉटरी; दलदलमय जमिनीवर दत्तात्रय यांचा बहाडोली जांभूळ शेतीचा यशस्वी प्रयोग

टॅग्स :जायकवाडी धरणमराठवाडानाशिकगोदावरीनदीधरणजलवाहतूकशेती क्षेत्र