Join us

पाणीचिंता वाढली; भर पावसाळ्यात मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यातील ४५ प्रकल्प जोत्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 17:03 IST

जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने बीड जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात म्हणावी तेवढी वाढ झालेली नाही. १६७ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ २७.८७ टक्केच पाणीसाठा झाला आहे.

शिरीष शिंदे 

जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने बीड जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात म्हणावी तेवढी वाढ झालेली नाही. १६७ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ २७.८७ टक्केच पाणीसाठा झाला आहे.

भर पावसाळ्यात ४५ पाणीसाठा प्रकल्प अद्यापही जोत्याखाली असून, ४० प्रकल्पांत २५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या ढगाळ वातावरण असल्याने पाण्याची बाष्पीभवन होण्याची गती कमी असली तरी मोठा पाऊस होणे आवश्यक आहे.

बीड जिल्ह्यात मे महिन्यात अवकाळी व पूर्व मोसमी पावसामुळे मोठा पाऊस झाला होता. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणी परिस्थिती पूर्णतः बदलून गेली होती. मे महिन्यात झाल्या पावसाने कोणत्याही ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली नाही, या उलट जवळपास लहान १० पाणीसाठा प्रकल्प तुडुंब भरून वाहू लागले होते. तसेच बीड तालुक्यातील बिंदुसरा प्रकल्प भरला तर परिसरातील जमिनीतील पाणी पातळी वाढली.

... अशी आहे पाणी परिस्थिती

जिल्ह्यात कडा अंतर्गत १४३, तर बीड पाटबंधारे विभागांतर्गत २४ पाणीसाठा प्रकल्प आहेत. लहान-मोठ्या अशा एकूण १६७ प्रकल्पांपैकी १५ प्रकल्प पूर्णतः भरलेले आहेत. ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले ६ प्रकल्प आहेत. २५ ते ५० टक्के भरलेले प्रकल्प ३३ आहेत. २५ टक्क्यांपेक्षा कमी असलेले ४०, तर जोत्याखाली असलेले ४५ पाणीसाठा प्रकल्प असल्याचे ४ जुलै रोजीच्या अहवालात नमूद आहे.

जूनमध्ये ११ दिवसच पाऊस

मे महिन्यात चांगला पाऊस झाल्याने जून महिन्यातसुद्धा चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांसह नागरिकाची होती; परंतु ही आशा फोल ठरली आहे. जून महिन्यात केवळ ५९ टक्केच पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे.

जून महिना सुरू झाल्यापासून पावसाची गती एकदमच मंदावली, ३० दिवसांच्या कालावधीत सरासरी ११ दिवस पाऊस झाला, तर १९ दिवस पाऊस झाला नाही. ११ दिवसांमध्ये झालेला पाऊस सुद्धा २ ते ११ मिमीच्या दरम्यान होता. जून महिन्यातील ३० दिवसांमध्ये एकाही ठिकाणी अतिवृष्टी किंवा ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची नोंद नाही. परिणामी, धरण साठ्यांत वाढ झालेली नाही.

धरणातील पाणीसाठा

पाणीसाठा प्रकल्प उपयुक्त पाणी दलघमीमध्ये टक्केवारी 
माजलगाव ३४.८०० ११.१५ 
मध्यम ७५.५११ ४९.८५ 
लघु ७७.५५७ ३०.७१ 
मध्यम एकूण (बीड पाटबंधारे)१३.१९१ ८४.७२ 
लघु व कोल्हापुरी पाटबंधारे १३.४६९ ३५.३७ 
सर्व प्रकल्प २१४.५२८ २७.८७ 

मागच्या वर्षी होता १८६ मिमी पाऊस

मागच्या वर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत १८६ मिमी पाऊस झाला होता, त्याची टक्केवारी ३३ होती. सध्या जुलै महिन्यापर्यंत केवळ ५९ मिमी पाऊस झाला असून, त्याची टक्केवारी १०.४ एवढी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अर्धासुद्धा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाणी संकट गंभीर बनत चालले आहे.

हेही वाचा : काही धरणे ओव्हरफ्लो तर काहींत थेंबभर सुद्धा आवक नाही; वाचा राज्यातील पाणीसाठ्याची अद्ययावत माहिती

टॅग्स :बीडपाणीकपातशेती क्षेत्रपाऊसमराठवाडापाणी टंचाई