Join us

कुंडलिका, मांजरा नदीकाठच्या गावांना इशारा; मांजराचे दोन दरवाजे उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 13:32 IST

सततच्या पावसामुळे उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्प पूर्ण भरला असून धरणाच्या सुरक्षिततेसाठी वक्रद्वार उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता धरणाचे २ वक्रद्वार २० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत.

सततच्या पावसामुळे उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्प पूर्ण भरला असून, धरणाच्या सुरक्षिततेसाठी वक्रद्वार उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता धरणाचे २ वक्रद्वार २० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. यातून कुंडलिका नदीपात्रात १३३८ क्युसेक (३७.८९ क्युसेक) इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्ग वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे प्रशासनाने कळविले आहे. त्यामुळे कुंडलिका नदीच्या काठावर असलेल्या गावांनी आणि पूरस्थितीचा धोका असलेल्या भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा उपविभागीय अधिकारी, कुंडलिका कालवा उपविभाग, बीड यांच्याकडून देण्यात आला आहे.

मांजराचे दोन दरवाजे उघडले

• मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे, प्रकल्पाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रविवारी सकाळी १०:३० वाजता धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले. त्यातून मांजरा नदीपात्रात १७४७.१४ क्युसेक (४९.४८ क्युमेक्स) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

• सध्या, मांजरा प्रकल्प ९८.९४% क्षमतेने भरला आहे. पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार, हा विसर्ग कमी-जास्त केला जाईल, असे मांजरा प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाने कळविले आहे.

हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र

टॅग्स :बीडधरणपाणीनदीमांजरा धरणमराठवाडाशेती क्षेत्रलातूर