Join us

चारच दिवसात विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला; विसर्ग सुरू केल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 11:53 IST

Vishnupuri Water Update : दमदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून चार दरवाजातून ५८ हजार ९०४ क्युसेस वेगाने गोदावरीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नांदेड शहर आणि आजूबाजूच्या परिसराची तहान भागविणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात चार दिवसांपूर्वी केवळ १८ टक्के जलसाठा होता. परंतु त्यानंतर झालेल्या दमदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून चार दरवाजातून ५८ हजार ९०४ क्युसेस वेगाने गोदावरीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणात वरच्या भागातून येवा सुरूच असल्यामुळे आणखी दरवाजे उघडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यंदा जून महिन्यात नांदेड जिल्ह्यात वादळीवारा आणि अवकाळी पावसाने थैमान घातले होते. या पावसामुळे फळबागा आडव्या झाल्या होत्या. त्यानंतर जून महिन्यात अल्पशा शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या होत्या. परंतु जुलै महिन्यात मात्र पावसाने चांगलीच विश्रांती घेतली होती.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पावसावर पळाले होते. परंतु आता जुलै अखेरीस मात्र नांदेडवर आभाळमाया दाखवित गेल्या तीन दिवसांपासून दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे माना टाकलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असून जलस्रोताचा साठा वाढण्यासही मदत झाली आहे.

नांदेड शहराची भिस्त असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात चार दिवसांपूर्वी केवळ १८ टक्के पाणीसाठा होता. परंतु वरच्या बाजूने येवा वाढल्याने शनिवारीच धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे शनिवारी रात्री धरणाचे दोन दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यात रात्रीच्या वेळी पुन्हा धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने विष्णुपुरीत आवक वाढली. परिणामी सकाळी साडेसात वाजेपर्यंत धरणाचे आणखी दोन दरवाजे उघडावे लागले.

सध्या प्रकल्पाच्या चार दरवाजातून ५८ हजार ९०४ क्युसेस वेगाने गोदावरीत विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी काठोकाठ वाहत आहे. परिणामी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

२४ तासात तालुकानिहाय झालेला पाऊस

तालुका  झालेला पाऊस तालुका झालेला पाऊस 
नांदेड ८१.६० किनवट ११.६० 
बिलोली १९.३० मुदखेड ८६.०० 
मुखेड ४०.२० हि. नगर २३.३० 
कंधार २३.१० माहुर १०.०० 
लोहा ४५.३० धर्माबाद ४४.९० 
हदगाव ३३.४० उमरी ५७.३० 
भोकर ५७.२०  अर्धापूर  ७१.४० 
देगलूर ३१.३० नायगाव २७.९० 

जिल्ह्यातील १७ मंडळात मुसळधार

• मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून रविवारी सकाळी १०.२७ पर्यंत पडलेल्या पावसाची नोंद ३९. ७० मिलीमीटर पर्जन्यमापकावर झाली आहे. त्यात सर्वाधिक पाऊस हा नांदेड तालुक्यात झाला असून त्याची नोंद ८१.६० मिलीमीटर झाली. तर सर्वात कमी १० मिलीमीटर माहूर तालुक्यात झाला आहे.

• मागील २४ तासात जिल्ह्यातील १७ महसूलमंडळात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये नांदेड, नांदेड, ग्रामीण, तुप्पा, वसरणी, विष्णुपुरी, लिंबगाव, तरोडा, वाजेगाव, नालेश्वर, कापसी, भोकर, मोघाली, मुदखेड, मुगट, बारड, दाभड, मालेगाव या महसूल मंडळात ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला.

हेही वाचा : गाजरगवताची ॲलर्जी झाल्यास काय कराल? कशी घ्याल काळजी; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :नांदेडमराठवाडाजायकवाडी धरणपाणीधरणनदीविष्णुपुरी धरणशेती क्षेत्र