मुंबई : राज्यातील बहुतांशी शहरांच्या कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे चटके बसत असतानाच आता पुढील सात दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे.
संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांत ३ ते १० मेपर्यंतच्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहील.
किरकोळ ठिकाणी एखाद-दुसऱ्या दिवशी विजांचा गडगडाट, वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. या वातावरणाचा प्रभाव विदर्भातील जिल्ह्यांत जाणवू शकतो. किरकोळ गारपिटीचीही शक्यता आहे. मुंबईत सकाळी आकाश ढगाळ असेल, तर दुपारी निरभ्र राहील.
महाराष्ट्रात कमाल तापमान ३८ अं.से. तर काही ठिकाणी ४० अं.से. आहे. शनिवारपासूनच्या आठवड्यात तापमान दोन अंश सेल्सिअसने खालावण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा कुठेही उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही. - माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
अधिक वाचा: पिक कर्जाच्या व्याज सवलत योजनेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ४६ कोटी रुपये अडकले