राज्यभरात बहुतांश ठिकाणी गुरुवारी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली. या अवकाळी आणि गारपिटीचा कहर सुरू असतानाच राज्यात पुढील चार ते पाच दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
राज्यभरातील हवामान बदलामुळे कमाल तापमानात किंचित घट झाली असली तरी सोलापूर, परभणी, नाशिक, जळगाव, मालेगाव आणि धाराशिवमध्ये पारा ३७अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. दरम्यान, मध्य-पश्चिम महाराष्ट्रात शनिवारपर्यंत तर शुक्रवारी मुंबईत अवकाळी पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रात वातावरणाच्या खालील स्तरावर तयार झालेल्या चक्राकार स्थितीमुळे आर्द्रता तयार झाली आहे. दुसरीकडे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात शुक्रवारीही (दि. ४) काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात हलका ते मध्य स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यानंतर वातावरण निरभ्र राहील.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे हवामानतज्ज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रावरील वातावरणाच्या खालील उष्णकटिबंधीय पातळीवर एक चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्वेकडील वाऱ्यांमुळे दक्षिण कर्नाटक ते नैऋत्य मध्य प्रदेशापर्यंत मराठवाड्यावर एक दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि लगतच्या बांगलादेशवर खालच्या उष्णकटिबंधीय पातळीवरही असाच कमी दाबाचा पट्टा असून, आग्नेय अरबी समुद्रावर चक्राकार स्थिती दक्षिण केरळपर्यंत तयार झाली.
आजही अवकाळी महाराष्ट्रात पावसाची शक्यता
• आग्नेय अरबी समुद्रावर चक्राकार प्रभावामुळे आणि अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्यावर येत आहेत. दिवसाचे तापमान अधिक असल्याने, तसेच या बाष्पामुळे मोठे ढग तयार होत आहेत. त्यामुळे दुपारनंतर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
• विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, शुक्रवारीही राज्याच्या कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
• कोकणात ९ एप्रिलपर्यंत ही स्थिती कायम राहणार असून, राज्याच्या अन्य भागात मात्र, आकाश निरभ्र राहून कमाल तापमानात दोन ते चार अंशांची वाढ होण्याचा अंदाज आहे, असेही सानप यांनी सांगितले.
हेही वाचा : नियमित खा फक्त एक चिकू; आरोग्यवर्धक चिकू दूर करेल विविध विकार