पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्याबरोबर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेले डिंभे धरण भरले असून धरणातून आज संध्याकाळी सहा वाजता दोन दरवाज्यातून दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग घोड नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
दोन दिवस पावसाने जोर धरल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन धरणात ९० टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणात साडेपाच हजार क्युसेक पाणी येत आहे तर धरणाच्या दोन दरवाजाद्वारे दीड हजार क्युसेक व वीज घरातून ५०० क्युसेक असे दोन हजार क्युसेक पाणी घोड नदी पात्रात सोडण्यात आले आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी लवकर धरण भरले आहे. अजून दोन महिने पावसाळा असल्याने धरणातून सतत विसर्ग सोडला जाणार आहे.
डिंभे धरणातून २००० क्युसेकने पाणी घोड नदीपात्रात सोडण्यात आले. पावसाचा जोर वाढल्यास अजून पाणी सोडावे लागू शकते. तरी नदीकाठच्या लोकांनी सतर्क रहावे व ग्रामपंचायतींनी देखील याची काळजी घ्यावी, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता दत्तात्रय कोकणे यांनी केले आहे.
चासकमान धरण ९२ टक्के भरले; पाचही दरवाजे उघडले
खेड आणि शिरूर तालुक्यांना वरदान ठरलेले चासकमान धरण शनिवारी (दि. २६ जुलै) ९२ टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले असून, भीमानदीच्या पात्रात ८१८० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.
दरम्यान, ७ जुलै रोजी धरणात ८० टक्के पाणीसाठा होता. गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणातील पाणीसाठा वेगाने वाढला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी सायंकाळी ५ वाजता नदीपात्रात ८१८० क्युसेक वेगाने विसर्ग सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा : पशुपालकांनो आवर्जून तयार करत चला 'गो'धनाची जन्मकुंडली; दूध व्यवसायात मिळवा आर्थिक वृद्धी