मागील काही दिवसांपासून दिवसा कडक ऊन आणि रात्रीच्या वेळी थंडी वाढत असल्याने पाहायला मिळत आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच जालना जिल्ह्याचा पारा ३८ अंशाच्या वर पोहोचला आहे.
येत्या २० मार्च नंतर उन्हाचा पारा वाढण्याची हवामान शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात पारा ४२ अंशाच्या वर जाण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे.
२०२३ मध्ये अत्यल्प पावसामुळे जालना जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागला. यामुळे २०२४ च्या उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती. उन्हाळ्यातील बहुतांश पाणी प्रकल्प कोरडे ठाक पडले होते.
२०२४ मध्ये देखील तीव्र उन्हाच्या झळा जिल्ह्यातील नागरिकांना सोसाव्या लागल्या. यंदा देखील उन्हाची तीव्रता अधिक भासण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
मार्च महिन्याच्या शेवटी वाढ
• यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाच्या असह्य झळा जाणवल्या. त्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. आता हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यात उष्णतेचा पारा आणखी चढण्याची शक्यता आहे.
• तसेच २० मार्चनंतर जालना जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाटा येणार असून अंगाची लाहीलाही होणार आहे. तसेच काही भागात ऊन-पावसाचा खेळ रंगण्याची ही शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा मार्च अधिक तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत.
तापमानात बदल
• एप्रिल-मे महिन्यामध्ये जाणवणाऱ्या कडाक्याच्या उन्हाचा अनुभव जालन्यातील नागरिक फेब्रुवारीमध्ये घेत आहे.
• तापमानामध्ये चढ-उतार सुरू आहे. सकाळी गारवा आणि दुपारी कडाक्याचे ऊन असे हवामान पाहायला मिळत आहे.
• फेब्रुवारी महिन्यात २०१६ नंतर पुन्हा उन्हाचा पारा वाढल्याचा अनुभव आलेला आहे. २१ फेब्रवारी रोजी जालना जिल्ह्याचे तापमान ३८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.
'एल-निनो'ची शक्यता
प्रशांत महासागरामध्ये होणाऱ्या हालचालींचा परिणाम राज्यातील हवामानावर होत असतो. सध्या प्रशांत महासागरात सौम्य 'ला-नीना' स्थिती सक्रिय आहे. मार्च ते मे महिन्याच्या कालावधीमध्ये ही स्थिती निवळून समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीवर येणार आहे.
परिणामी मान्सून हंगामात 'एल-निनो' स्थिती राहण्याचे संकेत आहेत. यामुळे मराठवाड्यातील काही भागांमध्ये उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
यंदाचा फेब्रुवारी महिन्यातच तापमान ३८ अंशावर पोहोचले होते. यामुळे दुपारी बाहेर पडताना उन्हाचे तीव्र चटके जाणवले. २० मार्चनंतर किंवा शेवटच्या आठवड्यात उन्हाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. - पंडित वासरे, कृषी हवामान तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना.