परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर प्रचंड वाढला असून पाऱ्याची घसरण चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. रविवारी नोंदवलेले ८ अंश सेल्सिअस तापमान सोमवारी सकाळी घटत थेट ६.६ अंशांवर स्थिरावले. हा पाऱ्याचा आकडा महाबळेश्वरच्या तापमानालाही मागे टाकणारा ठरला असून, परभणीकर अक्षरशः गारठून गेले आहेत.
शहरात पहाटेपासून दाट धुके पसरत आहे. रस्ते, इमारती, वाहनांच्या काचा, झाडेझुडपे पांढऱ्या धुक्याच्या चादरीत गुरफटल्यासारखे दिसत आहेत. सकाळी ७ नंतरही दृश्यमानता मर्यादित असल्याने वाहनधारकांना विशेष काळजीपूर्वक प्रवास करावा लागत आहे. पहाटे थंडीपासून बचाव करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.
थंडीच्या लाटेमुळे शहरातील दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम जाणवतो आहे. बाजारपेठा उशिरा सुरू होत आहेत, तर सकाळच्या सत्रात चहाच्या टपऱ्या, गरम दूध विक्रेत्यांपाशी मोठी उलाढाल होताना दिसत आहे. सध्या नागरिक गरम कपडे, मफलर, शाल, टोपी यांची खरेदी करण्याकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत.
शनिवारपासूनच थंडीने जोर पकडला होता. त्यात रविवारी तापमान ८ अंशांवर आल्याने थंडीचा कडाका वाढला; परंतु सोमवारी सकाळी ६.६ अंशांची नोंद झाल्याने थंडीची तीव्रता कमालीची वाढली. अचानक पडलेल्या गारठ्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारपण असलेले नागरिक अधिक त्रस्त झाले असून, डॉक्टरांकडे रुग्णसंख्या वाढू लागली आहे.
सामान्यतः महाबळेश्वर येथे डिसेंबर महिन्यात ७-८ अंश तापमानाची नोंद होते. मात्र, सोमवारी परभणीचे तापमान ६.६ अंशांवर पोहोचल्याने नागरिकांमध्ये चर्चा रंगली. आता महाबळेश्वर सोडा, थंडीचा अनुभव घ्यायचा असेल तर परभणीला या, असे वातावरण निर्माण झाले आहे.
२०१८ मध्ये होते ३.९
१२ डिसेंबर २००४ - ५ अंश
१९ डिसेंबर २००५ - ५ अंश
२९ डिसेंबर २०१८ - ३.९ अंश
८ डिसेंबर २०२५ - ६.६ अंश
उत्तर भारतात थंड हवेचे वारे वाहत असल्याने परभणी जिल्ह्यात हवेत मोठ्या प्रमाणात गारवा जाणवत आहे. हा गारवा येत्या काही दिवस कायम राहणार आहे. - कैलास डाखोरे, हवामानतज्ज्ञ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ.
हेही वाचा : उत्तम आरोग्यासाठी साखर खाणं हानिकारकच, पण गूळ किती चांगला? जाणून घ्या सविस्तर
