ओव्हरफ्लो झालेल्या गिरणा धरणात अवघा २८ टक्के जलसाठा उरला आहे. त्यातून शुक्रवार, १६ रोजी सकाळी ६ वाजता पेयजलासाठीचे तिसरे आवर्तन सुटणार आहे. मन्याड धरणात मंगळवारअखेर १५ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
मन्याडमधून सिंचनासाठीचे दोन्ही आवर्तने यापूर्वीचं दिली गेली आहेत. आवर्तनाचा पाणी प्रवाह १० ते १५ दिवस नदीपात्रात कायम राहील. आवर्तनामुळे पुढील ४५ दिवसांची चिंता मिटणार आहे. यामुळे निम्म्या जिल्ह्याला दिलासा मिळणार आहे.
उन्हाची तीव्रताही वाढल्याने धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. अवकाळीच्या तडाख्याने उन्हाचा पारा काहीअंशी कमी झाला आहे. पावसाळा सुरु होण्यास अजून २० ते २२ दिवसांचा अवधी असल्याने पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.
पाचोरा, भडगाव नगरपालिकेसह चाळीसगाव औद्योगिक वसाहतीकडून तिसरे आवर्तन सोडण्याची मागणी केली गेली. शुक्रवारी १५०० क्यूसेसचे आवर्तन सकाळी ६ वाजता सोडण्यात येणार आहे. हे पाणी कानळदा गावापर्यंत पोहचेल. - विजय जाधव, उपअभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, चाळीसगाव.
सिंचनासाठी मिळाली तीन आवर्तने
• गेल्यावर्षी ५६ टक्के भरलेल्या गिरणा धरणातील जलसाठा फक्त पेयजलासाठी आरक्षित केला गेला. त्यामुळे सिंचन क्षेत्राला मोठा फटका बसला होता. यंदा मात्र धरण भरल्याने सिंचनासाठी तीन आवर्तने दिली गेली आहेत.
• याचा थेट फायदा गिरणाखो-यातील हजारो हेक्टर शेती क्षेत्राला झाला. रब्बी पिकांनाही दिलासा मिळाला आहे. गेल्यावर्षी मन्याड देखील कोरडेठाक होते. यावर्षी तेही ओव्हरफ्लो झाल्याने याधरणातून सिंचनासाठी दोन आवर्तने दिली गेली. मन्याड धरणाचा यापट्ट्यातील १९ गावांना लाभ होतो.
गिरणातून पेयजलासाठी तिसरे आवर्तन
• गिरणा धरण ओव्हरफ्लो झाल्यास पेयजलासाठी चार आवर्तने दिली जातात.
• यापूर्वी दोन आवर्तने दिली असून मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे आवर्तनाचा कालावधी काहीसा लांबला आहे.
• गिरणा धरणातून मालेगावसह चाळीसगाव औद्योगिक वसाहतीलाही पाणीपुरवठा केला जातो.
• पाचोरा, भडगाव नगरपालिकेसह चाळीसगाव औद्योगिक वसाहतीच्या मागणीनंतर आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा : फवारणीपूर्वी तपासा पाण्याचा सामू; पीएच बरोबर नसेल तर महागडी फवारणी सुद्धा जाईल फेल