Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुढील पाच ते सहा दिवस पावसाचा जोर ओसरणार; पेरणी करावी का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 09:18 IST

कोकण वगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नसून पुढील दोन दिवसात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचा जोर आणखी कमी होत जाईल.

मुंबई/पुणे : कोकण वगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नसून पुढील दोन दिवसात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचा जोर आणखी कमी होत जाईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

सध्या झालेला पाऊस अनपेक्षित असून, पावसाचा जोर कमी झाल्यास व उघडीप मिळाल्यास पेरणीयोग्य वापसा स्थिती तयार होणार आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

गेला आठवडाभर पावसाने राज्यात दाणादाण उडवून दिली. हवामान विभागाने हा पाऊस मान्सूनचा असल्याचे म्हटले तर तज्ज्ञांनी पूर्वमोसमी असल्याचे सांगितले. त्यानंतर आता पुढील पाच दिवसात पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

आता राज्यात पावसाचा प्रवास कसा?◼️ भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप म्हणाले, मान्सूनच्या वाऱ्यांमधील जोर कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यावरील कमी दाबाचे क्षेत्र विरले असून, अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टाही विरला आहे.◼️ राज्यात पुढील चार ते पाच दिवसांमध्ये कोकणवगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही. कोकणात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर तेथेही पाऊस कमी होईल.

लगेच पेरणी केल्यास दुबार पेरणीचा धोका◼️ राज्याच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला असताना लगेच पेरण्या कराव्यात की नाहीत याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असताना आता कृषी खात्याने लगेच पेरण्या न करण्याचा सल्ला दिला आहे.◼️ कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'लोकमत'ला सांगितले की, पेरणीसाठी जमिनीमध्ये जितकी ओल असणे आवश्यक असते त्यापेक्षा कितीतरी जास्त ओल अतिवृष्टीमुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे पेरणी करतानादेखील अनेक अडचणी येतील. मातीचे लगेच गोळे होत असल्याने बीजरोपण योग्य पद्धतीने होणार नाही.◼️ असे असूनही पेरणी केली आणि नंतर आठ-दहा दिवसांपेक्षा अधिक उघडीप राहिली तर पेरणी वाया जाण्याची शक्यता अधिक असेल, अशावेळी दुबार पेरणीशिवाय पर्याय राहणार नाही. काळ्या, मध्यम वा हलक्या शेतजमिनीवरही लगेच पेरणी करण्याची घाई करू नये.

अतिवृष्टी झालेल्या विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी वापसा आल्यानंतर बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. - विनयकुमार आवटे, कृषी संचालक

अधिक वाचा: महावितरणचा अजब कारभार; परवाना साडेसात एचपीचा बिल मात्र आठ एचपीचे, काय आहे प्रकरण?

टॅग्स :हवामान अंदाजपेरणीपाऊसशेतीपीकमोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाजमहाराष्ट्रमराठवाडा