उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरण बुधवारी पहाटे भरले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर नवीन पाण्याची आवक झाली आहे.
धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी बुधवारी २० हजार ७६३ क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सोडण्यात आला. भंडारदरा धरणातून सोडण्यात येत असलेल्या मोठ्या प्रमाणावरील पाण्यामुळे निळवंडे धरणही भरण्याच्या मार्गावर आहे.
त्यामुळे या धरणातूनही प्रवरा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे प्रवरेच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे भंडारदरा जलसंपदा विभागाचे अभियंता प्रवीण भांगरे सांगितले.
पाणलोट क्षेत्रातील रतनवाडी येथे १७० मिमी तर घाटघर येथे १६० पावसाची नोंद झाली. तालुक्याच्या पश्चिम पट्टयातील लहान मोठे धबधबे पुन्हा एकदा जोमाने फेसाळत आहेत. ११ हजार ३९ दलघफू क्षमता असणारे भंडारदरा धरण बुधवारी पहाटे तीन वाजता पूर्ण क्षमतेने भरले.
धरणाच्या सांडव्याचे दोन्ही लोखंडी दरवाजातून १२ हजार २३१ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. पुढे या विसर्गात वाढ करण्यात आली. रंधा धबधब्यानेही रौद्र रूप धारण केले आहे.
दरम्यान भंडारदरा धरणस्थळी सहायक अभियंता योगेश जोर्वेकर यांच्यासह शाखा अभियंता प्रवीण भांगरे, पर्यवेक्षक वसंत भालेराव, कर्मचारी हौशीराम मधे, कालवा निरीक्षक विनोद सोनवणे, संदेश वाहक विजय हिवाळे आदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
कृष्णावंतीलाही पूर, पाणी जायकवाडीकडेकळसुबाई शिखर परिसरातही मुसळधार पाऊस पडत असल्याने प्रवरेची उपनदी असलेल्या कृष्णावंती नदीलाही पूर आला आहे. त्यामुळे निळवंडे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. याही धरणातून ११ हजार ९१९ क्युसेकने प्रवरा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रवरेच्या पाण्याचा जायकवाडीकडे प्रवास सुरू झाला आहे.
मुळेचा विसर्ग २३ हजारहरिश्चंद्रगड परिसरातही मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मुळा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. मुळा नदीचा कोतूळ जवळील लहित येथील विसर्ग २३ हजार क्युसेकहून अधिक होता.
अधिक वाचा: पुढील ३ महिन्यांच्या आत प्रत्येक ग्रामपंचायतीत होणार हवामान केंद्र; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर