Join us

चासकमान धरणात उरला इतका पाणीसाठा; भीमा नदीपात्र पडले कोरडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 1:45 PM

मागील वर्षी चासकमान धरणात मार्च महिन्याअखेर ४२ टक्के पाणी साठा उपलब्ध होता. यंदा मात्र ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

खरपुडी (ता. खेड) येथील भीमा नदीवरील बंधाऱ्यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. चासकमान धरणातूनपाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. चासकमान धरणात ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून उन्हाळ्याच्या अजून दोन महिने आहेत. पाणी मिळेल का नाही? या चिंतेत शेतकरी आहेत.

मागील वर्षी चासकमान धरणात मार्च महिन्याअखेर ४२ टक्के पाणी साठा उपलब्ध होता. यंदा मात्र ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे. खरपुडी येथील बंधारा यंदा तुडुंब भरला होता.

होणारा पाणी उपसा, बंधाऱ्यातून होणारी गळती तसेच गेल्या काही दिवसातील कडक उन्हामुळे बंधाऱ्यातील पाणी पातळीत घट झाली आहे. चासकमान धरणातून डाव्या कालव्याला चारशे क्युसेसने पाण्याचे उन्हाळी आवर्तन सुरू आहे.

मात्र भीमा नदीपात्रावरील बंधाऱ्यातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालवत आहे. या धरणाचा पाण्यावरती या परिसरातील शेतकऱ्यांनी शेकडो एकर क्षेत्रात उन्हाळी हंगामातील पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत.

काही शेतकरी उन्हाळी पिके घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र पाणी साठा संपुष्टात येत असल्यामुळे पिके घेऊ का नको या चिंतेत आहेत. खरपुडी बंधाऱ्याचा पाण्याचा फुगवटा मांजरेवाडी, मलघेवाडी व शिरोली परिसरात येतो. पाणीसाठा कमी झाल्याने शेतकऱ्यांचे कृषी विद्युत पंप बंद पडले आहेत.

पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांची पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. चासकमान धरणातून पाणी नदीपात्रात पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सध्या शेतातील शेती पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी नदीतील पाणी उपसा करतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिकांना दिवसाआड पाणी लागते. त्यामुळे साठलेले पाणी कमी होऊ लागले आहे. येत्या आठ ते दहा दिवसात बंधारा कोरडाठाक होण्याच्या मार्गावर असून धरणातून पाणी सोडावे. - घनश्याम मलघे, ग्रामपंचायत सदस्य, मांजरेवाडी ता. खेड

टॅग्स :धरणपाणीपुणेनदीशेतकरीशेतीपीकखेड