दादासाहेब गलांडे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यात शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे चांगलाच हाहाकार माजवला. पंथेवाडी येथे दोन मेंढपाळांच्या ५४ शेळ्या, मेंढ्यांसह एक बैल, दोन गोन्हे व संपूर्ण संसारोपयोगी साहित्य ओढ्याला आलेल्या पुराने गोदावरील नदीत वाहून गेले. यामुळे मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पैठण तालुक्यातील रहाटगाव येथील मेंढपाळ मल्हारी डोईफोडे व अंबादास खोलासे हे मेंढ्या चारण्यासाठी पंथेवाडी शिवारात राहत होते. शनिवारी मध्यरात्री परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे दीडच्या सुमारास शेजारील ओढ्याला मोठा पूर आला.
काही कळायच्या आत या पुरात दोन्ही मेंढपाळांच्या १४ मेंढ्या, ३३ कोकरे, बोकड, शेळ्या ९ अशा ५४ शेळ्या, मेंढ्यांसह एक बैल व दोन गोन्हे तसेच सर्व संसारोपयोगी साहित्य व तीन मोबाइल वाहून ओढ्यातून गोदावरी नदीत वाहून गेले. सर्व संसारच वाहून गेल्याने ही दोन्ही कुटुंबे उघडचावर आली आहेत. रविवारी या घटनेचा पंचनामा पैठणच्या तलाठी शीतल झिरपे यांनी केला.
मेंढपाळांबाबत मनाला हेलावून टाकणारी घटना घडली असून शेळ्या, मेंढ्यांसह जनावरे वाहून गेल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. तसेच जुने दादेगाव येथे गोदावरीच्या काठावर मोलमजुरी करण्यासाठी आलेली दोन आदिवासी कुटुंबे पुराच्या पाण्यात अडकली होती. त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने तत्काळ सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली.
नांदरमध्ये २०९ मिमी, पाण्यात कांदा गेला वाहून
पैठण तालुक्यातील नांदर मंडळात २०८.८ मिमी पाऊस झाला. पावसाच्या पाण्यात ज्ञानेश्वरवाडी शिवारातील शेतकरी अंबादास परसराम थोटे यांचा एका एकरातील कांदा वाहून गेला. नानेगाव येथील शेतकरी विठ्ठल माने यांच्या शेतात पाणी साचले, नांदरचे सचिन तांगडे यांच्या घराची भिंत कोसळली. नीलाबाई भगवान जाधव यांच्या घरात पाणी शिरले. तलाठी राम केंद्रे, पोलिस पाटील गोपाळ वैद्य, कर्मचारी ज्ञानेश्वर उचित यांनी पाहणी केली.
जायकवाडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस
जायकवाडी परिसरातील गावांमध्ये शनिवार सायंकाळी विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. वाहेगाव, कातपूर, मुथलवाडी, पिंपळवाडी पिराची, टाकळीपैठण, धनगाव, ईसारवाडी, कारकीन, ईसारवाडी, बोरगाव, पाचलगाव, वरूडी आदी गावांमध्ये संततधार पाऊस झाला. त्यामुळे कापूस, तूर, सोयाबीन, मका, मूग, ऊस आदी पिकांमध्ये पाणी साचले होते.
महसूल अधिकाऱ्यांकडून पाहणी
कातपूर, मुधलवाडी येथील शेतकऱ्यांचे मोसंबी, कपाशी पिकाचे नुकसान झाले. तर कांद्याचे पीक वाहून गेले. गावातील काही घरांमध्ये पाणी शिरले होते. पिंपळवाडी पिराची येथील तीन घरांची पडझड झाली. व्यापारी कौसर शेख यांच्या दुकानाच्या तळघरात चार ते पाच फूट पाणी साचले होते. दरम्यान, तहसीलदार ज्योती पवार, मंडळ अधिकारी कल्पना पोकळे, तलाठी सोनवणे यांनी पंचनामे केले.