Join us
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामासाठी बोरी धरणातून आवर्तन सुटल्याने शेतीला दिलासा; यंदा शेतीसाठी राहणार तीन आवर्तने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 12:29 IST

तामसवाडी येथील बोरी धरणाच्या दोन्ही पाटचाऱ्यांतून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. या रब्बी हंगामात उन्हाळी ज्वारी तसेच बाजरी व काही प्रमाणात गहू व हरभरा पेरा करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसून येत आहे.

जळगाव जिल्ह्याच्या पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी धरणाच्या दोन्ही पाटचाऱ्यांतून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. या रब्बी हंगामात उन्हाळी ज्वारी तसेच बाजरी व काही प्रमाणात गहू व हरभरा पेरा करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसून येत आहे. या धरणावरून उजवा व डावा असे दोन कालवे कार्यान्वित आहेत.

उजव्या कालव्यातून दि. २९ डिसेंबर रोजी ३५ क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. कालव्यावर १३ गावे अवलंबून आहेत. हा कालवा २१ किलोमीटर लांब आहे. या अंतर्गत एकूण २ हजार ९९५ हेक्टर जमीन येते. यापैकी रब्बी हंगामात ३०० हेक्टर क्षेत्रावर, ४०० शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केलेली आहे.

तसेच डावा कालवा हा ९ किलोमीटर लांबीचा असून यावर ७ गावे अवलंबून आहेत. या अंतर्गत १ हजार ५५८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. या रब्बी हंगामात २५० शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केलेली आहे. प्रथम आवर्तन हे हे १ जानेवारी २०२६ रोजी २५ क्युसेस प्रमाणात सोडण्यात आले आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी सुटणार केवळ एक आवर्तन

• यंदा बोरी धरणातून ४ आवर्तने सुटणार असून त्यातील ३ आवर्तने शेती पिकासाठी तर शेवटचे आवर्तन हे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणार आहे. याअंतर्गत १७ ग्रामपंचायतींना लाभमिळणार आहे.

• रब्बी हंगामात या पाणलोट क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाद्वारे करण्यात आले आहे.

बोरी धरणात यंदा मुबलक पाणीसाठा

• यंदा अवकाळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे बोरी धरणात मुबलक पाणीसाठा राहिला असून शेतातील विहिरींनाही आतापर्यंत चांगला पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत.

• खरीप हंगामात अवकाळीमुळे तसेच अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे आता शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर राहणार आहे.

हेही वाचा : गणूदादा यांच्या नवीन जुगाड तंत्राने ट्रॅक्टरद्वारे पेरणी केल्यावर दांड पाडणे आता होणार सोपे

English
हिंदी सारांश
Web Title : Relief for Farmers: Water Released from Bori Dam for Rabi Season

Web Summary : Water released from Bori Dam for Rabi crops in Parola, Jalgaon. Three rotations for agriculture, one for drinking water. Farmers are relieved due to sufficient water availability, despite previous Kharif losses. Irrigation department urges farmers to benefit.
टॅग्स :रब्बी हंगामशेतकरीशेतीशेती क्षेत्रजळगावधरणपाणी