Join us

Radhanagari Dam पावसाचा जोर वाढल्यास जुलैअखेर राधानगरी पूर्ण क्षमतेने भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 18:04 IST

काल दिवसभरात राधानगरी धरण क्षेत्रात १३६ मिमी पावसाची नोंद झाली असून, राधानगरी धरणात ६०.८१ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. राहून राहून जोरदार सरी येत राहिल्याने पाणीचपाणी होत होते. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हवेत कमालीचा गारठा राहिला.

पंचगंगा नदीतील पाणी पातळीतही वाढ झाली. राजाराम बंधाऱ्यावर रात्री ८ वाजता २५ फूट पाणी पातळी राहिली. जिल्ह्यातील एकूण ४९ बंधारे पाण्याखाली गेले. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली आहे.

बुधवारी दिवसभर पावसाचा जोर कमी होता. राहून राहून ऊनही पडले होते. दरम्यान, मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर अधिक राहिला. रात्रभर सरीवर सरी कोसळत राहिल्या. सकाळी ८ पर्यंत झालेल्या २४ तासात जिल्ह्यात ४२. ४ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक गगनबावडा तालुक्यात ९६.९ मिलिमीटर तर सर्वात कमी पाऊस शिरोळ तालुक्यात १२. ६ मिलिमीटर झाला.

तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, तालुक्यातील तिन्ही धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राधानगरीधरण ६० टक्के भरले असून, पावसाचा जोर वाढल्यास जुलैअखेर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

काल दिवसभरात राधानगरी धरण क्षेत्रात १३६ मिमी पावसाची नोंद झाली असून, राधानगरी धरणात ६०.८१ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. म्हणजेच ५०५८.०७ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. तर दूधगंगा धरणात ४७ टक्के इतका पाणीसाठा असून, तुळशी जलाशय ५८.८५ टक्के भरले आहे.

राधानगरी धरण परिसरात जून महिन्यापासून ते १८ जुलैपर्यंत १८८६ मिमी पावसाची नोंद झाली असून, गतवर्षी याच तारखेस १२४४ मिमी पावसाची नोंद झाली होती. राधानगरी धरणातील वीज निर्मिती केंद्रातून १४०० क्युसेस विसर्ग भोगावती नदीपात्रात चालू असल्याने नदीपात्रात वाढ होत आहे.

टॅग्स :राधानगरीधरणपाणीकोल्हापूरपाऊस