Join us

औरंगाबाद जिल्ह्यात पुढील पाच दिवस तुरळक हलक्या सरींची शक्यता, शेतकऱ्यांनी काय घ्यावी काळजी? 

By मुक्ता सरदेशमुख | Updated: August 29, 2023 19:00 IST

औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवस आकाश अंशत:ढगाळ राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३३ ते ...

औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवस आकाश अंशत:ढगाळ राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४१ ते ८४ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १२ ते १४ किमी प्रति तास राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दि. ०३ ते ०९ सप्टेंबर  दरम्यान आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहून पर्जन्यमान,कमाल तापमान व किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी काय कराव्यात उपाययोजना? 

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना खालील कृषी हवामान सल्ला दिला आहे.

सोयाबीन-फुलोरा ते शेंगा धरणे अवस्था

सद्यस्थितीत सोयाबीन पीकास पाण्याचा ताण बसत असुन त्याकरीता पोटॅशियम नायट्रेट(१३:००:४५) १०० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात ‍मिसळून फवारणी करावी. तसेच पाण्याची उपलब्धता असल्यास पीकास तुषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. ढगाळ व दमट वातावरणामुळे सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १२.६ टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेडसी २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ व शांत वातावरणात फवारणी करावी.  

खरीप ज्वारी- पोटरी अवस्था

ढगाळ व दमट वातावरणामुळे ज्वारी पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असुन, प्रादुर्भाव ओळखण्यासाठी पिकात १५ कामगंध सापळे प्रति एकर याप्रमाणे लावावेत. प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडिरॅक्टिन १५०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ व शांत वातावरणात फवारणी करावी.

बाजरी- पोटरी अवस्था

दमट वातावरणामुळे बाजरी पिकामध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ व शांत वातावरणात फवारणी करावी.

खरीप भुईमूग - शेंगा धरणे अवस्था

ढगाळ वातावरण व वाढलेल्या आर्द्रतेमुळे भुईमुग पिकामध्ये टिक्का रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी हेक्साकोनाझोल ५ टक्के ईसी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत वातावरणात फवारणी करावी. तसेच तसेच पिकास हलकी भर द्यावी व गरजेनुसार तुषार सिंचनाच्या सहाय्याने पाणी व्यवस्थापन करावे.

आद्रक- फुटवे  अवस्‍था

दमट वातावरणामुळे आद्रक पिकामध्ये कंदसड दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर प्रति एकर प्रमाण घेऊन पाण्यात मिसळुन आळवणी करावी. तसेच पिकास गरजेनुसार सिंचन करावे. 

हळद- फुटवे अवस्‍था

दमट वातावरणामुळे हळद पिकामध्ये कंदसड दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर प्रति एकर प्रमाण घेऊन पाण्यात मिसळुन आळवणी करावी. तसेच पिकास गरजेनुसार सिंचन करावे.  

मोसंबी-फळ वाढीची अवस्‍था

ढगाळ वातावरण व वाढलेल्या आर्द्रतेमुळे मोसंबी बागेमध्ये कोवळ्या पानावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० टक्के ईसी २० मिली किंवा फिप्रोनिल ५ टक्के एसएल २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच फळांची प्रत सुधारण्यासाठी जिब्रेलिक ऍसिड (GA) २ ग्रॅम + पोटॅशियम नायट्रेट १.५ किलो + बोरिक ऍसिड ३०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच बागेत गरजेनुसार पाणीव्यवस्थापन करावे.

डाळिंब-फळ वाढ ते काढणी अवस्‍था

डाळिंब बागेमध्ये फायटोप्थोरा बुरशीमुळे मर दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मेटालॅक्झिल ८ टक्के + मॅन्कोझेब ६४ टक्के २० ते २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन आळवणी करावी.

भाजीपाला-फुल ते फळ धारणा अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे भाजीपाला पिकांवर रस शोषण करणा-या (फुलकीडे, मावा इत्यादी) किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी निळे व पिवळे चिकट सापळे प्रत्येकी २५ प्रति एकर याप्रमाणे लावावेत तसेच प्रादूर्भाव जास्त दिसून येत असल्यास फिप्रोनिल ५ टक्के एससी २० मिली  प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्याचप्रमाणे भाजीपाला पिकास गरजेनुसार संरक्षित सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे.

तुती रेशीम

यशस्वी कोष उत्पादनासाठी तुती पिकाच्या लागवडीनंतर दर दिड महिण्यांनी तुतीची छाटनी करावी. लागवडीच्या दुस-या वर्षापासून पुढे १५ ते २० वर्षापर्यंत मिळू शकते. पण तुतीच्या वाढीसाठी आवश्यक अन्नघटक नत्र, स्फुरद, पालाश या रासायनिक खतांची मात्रा १४० किग्रॅ अमोनियम सल्फेट १७० किग्रॅ सिंगल सुपर फॉस्फेट आणि १९ किग्रॅ म्युरेट ऑफ पोटॅश प्रति एकर प्रति कोषाचे पीक याप्रमाणे देणे गरजेचे आहे. जुन व नोव्हेंबर महिण्यात ४ क्विंटल प्रमाणे एकुण ८ क्विंटल कुजलेले शेणखत टाकणे आवश्यक आहे. इतर जैविक खते व हिरवळीची खते टाकणे त्याचबरोबर जून व जानेवारी महिण्यात पटटा पध्दत लागवडीत बरु किंवा ढेंचा हे व्दिदल पीक पेरणी करुन फुलोरा अवस्थेत जमिनीत गाडून टाकावे.

पशुसंवर्धन

गोवंशीय पशुधनामध्ये लम्पीस्कीनचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. यात लहान वयातील वासरांमध्ये रोगाचा प्रादूर्भाव होवून मृत्युचे प्रमाण अधिक आहे. याच्या नियंत्रणासाठी व पशुधनातील प्रतिकारशक्ती वाढविण्याकरीता लहान वासरांना चिक पाजावा, वयाच्या सातव्या दिवशी जंतनाशक औषधींची मात्रा द्यावी व त्याप्रमाणे वेळेवर लसीकरण करावे, जनावरांमध्ये आजारी व निरोगी जनावरे असे विलगीकरण करावे व त्यांच्या चारा पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी तसेच यामध्ये वरील उपायांसोबत पशुधनाची जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

इतर

सद्यस्थितीत जिल्हयात ब-याच ठिकाणी कमी पाऊस झाल्यामुळे पीकांना पाण्याचा ताण बसत असुन त्याकरीता पोटॅशियम नायट्रेट(१३:००:४५) १०० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात ‍मिसळून फवारणी करावी. तसेच पीकांना गरजेप्रमाणे उपलब्धतेनूसार संरक्षित सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

टॅग्स :मोसमी पावसाचा अंदाजहवामानऔरंगाबादशेतकरीपीक व्यवस्थापनकृषी विज्ञान केंद्रपीकमोसमी पाऊसपाऊसखरीप