भंडारदरा निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे सातत्य टिकून असल्यामुळे या दोन्ही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन पाण्याची आवक सुरूच आहे.
शुक्रवारी सकाळी रतनवाडी येथे ६१, घाटघर ४५ व भंडारदरा येथे ४७ मिमी पावसाची नोंद झाली. शुक्रवारी नवीन पाणी निळवंडे धरणात सोडण्यात आले. हे धरण ही पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या धरणातून ही प्रवरा नदीतपाणी सोडण्यात आले.
गुरुवारी पाणलोटातील रतनवाडी व पांजरे येथे १०० मिमी हून अधिक पावसाची नोंद झाली होती. यामुळे गुरुवारी भंडारदरा धरणात २४ तासांत तब्बल १ हजार १२३ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली होती. त्यामुळे निळवंडे धरणातील पाणीसाठ्चात झपाट्याने वाढ झाली.
या पाण्याबरोबर निळवंडे पाणलोटात ही पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे निळवंडेमध्ये शुक्रवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत सुमारे सव्वा टीएमसी म्हणजेच १ हजार २१६ दलघफू नवीन पाणी आले होते, तर शुक्रवारी सकाळी ५०१ दलघफू पाणी आले.
दरम्यान निळवंडे धरणातून सोडण्यात येत असलेला विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे पाणीसाठ्चात वाढ झाली. निळवंडे धरणातून नदी पात्रात ७ हजार २२० तर कालव्यांद्वारे ५२३ असे एकूण ७ हजार ८९० क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते.
शुक्रवारी सकाळी सहा वाजता ११ हजार ३९ दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा १० हजार ८५७ दलघफू इतका होता तर धरणातून ३ हजार ३५७ क्यूसेकने विसर्ग सुरु होता.
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण समजली जाणारी ही दोन्ही धरणे भरल्यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घाटघर ऐवजी रतनवाडीत सर्वाधिक पाऊसएरव्ही भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर येथे सर्वाधिक पावसाची नोंद होत होती. त्यामुळे घाटघरला जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखले जात होते. मात्र यावर्षी रतनवाडी येथे या मोसमात आजपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते २२ ऑगस्ट दरम्यानच्या ८२ दिवसांत घाटघर येथे ४ हजार १६१ मिमी तर रतनवाडी येथे त्याहून अधिक म्हणजेच ४ हजार २७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अधिक वाचा: राज्यातील जमीन मोजणीची प्रकरणे आता तातडीने निकाली लागणार; आले नवीन १२०० रोव्हर