Join us

घाटघर येथे पुन्हा पाच इंचाहून अधिक पाऊस; भंडारदरा धरणात झाला किती पाणीसाठा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:55 IST

Bhandardara Dam Water Level अकोले तालुक्यातील पश्चिम पट्टयातील घाट माथ्यावरील मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.

अकोले तालुक्यातील पश्चिम पट्टयातील घाट माथ्यावरील मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.

घाटघर येथे पुन्हा पाच इंचाहून अधिक पाऊस कोसळला आणि गुरुवारी (दि. ३) सकाळी सहा वाजता भंडारदरा धरणातीलपाणीसाठा ६५ टक्क्यांहून अधिक झाला.

जलाशय परिचलन सूचीनुसार धरणातील पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने दुपारी तीन वाजता या धरणाच्या स्पीलवे गेटमधून पाणी सोडण्यास सुरुवात केली.

दरम्यान, मुळा खोऱ्यातील घोटी शिळवंडी येथील १४३.५५ दलघफू क्षमतेचा लघु पाटबंधारे तलाव गुरुवारी दुपारी एक वाजता पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला.

यावर्षी जून महिन्यात या दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात विक्रमी पाऊस कोसळला. एक जून ते ३ जुलै या ३३ दिवसांत घाटघर आणि रतनवाडी येथे तब्बल दीड हजार मिमीहून अधिक म्हणजेच घाटघर येथे १५६७ मिमी तर रतनवाडी येथे १५८५ मिमी पाऊस पडला.

गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत भंडारदरा धरणात सुमारे अर्धा टीएमसीच्या जवळपास म्हणजेच ४३७दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. निळवंडे पाणलोटात पावसाची संततधार सुरूच असल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होणार आहे.

सकाळी सहा वाजता निळवंडेतील पाणीसाठा ५५ टक्क्यांहून अधिक म्हणजेच ४ हजार ६३४ दलघफूपर्यंत पोहोचला होता. निळवंडेतून ९०० क्युसेकने पाणी प्रवरा पात्रात सोडण्यात आले.

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी सकाळी घाटघर १२७, रतनवाडी ११९, पांजरे ६३, भंडारदरा ५५ तर वाकी ५९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.

अधिक वाचा: Maharashtra Weather Update : पुढील चार दिवस या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

टॅग्स :धरणपाणीअकोलेपाऊसनदीमुळा मुठा