Join us

मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यात अध्याप १८८ मिमी पावसाची तूट; दुबार पेरणीचे संकटाने शेतकरी चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 17:27 IST

पुनर्वसू नक्षत्रातील आठ दिवस उलटले, तरी पाऊस नाही. खरिपातील कोवळी पिके कोमजत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त होत आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट येणार की काय, अशी धास्ती लागली आहे.

पुनर्वसू नक्षत्रातील आठ दिवस उलटले, तरी लातूर जिल्ह्यात पाऊस नाही. खरिपातील कोवळी पिके कोमजत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त होत आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट येणार की काय, अशी धास्ती लागली आहे.

दरम्यान, लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १०१.८ मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १८८.१ मिमी पावसाची तूट आहे.

लातूर जिल्ह्यात खरीपाचे सरासरी ६ लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे खरीप पेरण्यांना प्रारंभ झाला. मृगाच्या प्रारंभी दोन-तीन दिवसांच्या पावसाने पेरणीस वेग आला. त्यानंतर मात्र, मृगाने उघडीप दिली. आर्द्राही कोरड्या गेल्या.

गतवर्षीच्या तुलनेत पावसाची किती तूट ?

तालुका तूट (मिमी)
लातूर २७७.५ 
औसा २३१.८ 
अहमदपुर १७३.४ 
निलंगा १९२.६ 
उदगीर ८५.१ 
चाकूर १७५.४ 
रेणापूर २८३.९ 
देवणी १०४.० 
शिरूर अनं. १२६.८ 
जळकोट ७५.८ 
सरासरी १८८.१ 

गत आठवड्यापासून पुनर्वसू नक्षत्रास प्रारंभ झाला आणि वातावरणात बदल होऊन आभाळ येण्यास सुरुवात झाली. मात्र, दोन दिवसांपासून उन्हें जाणवत असल्याने उकाडा वाढला आहे.

पावसाच्या उघडीपीचा पिकांवर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांनी कोळपणी करावी. त्यामुळे ओल टिकून राहण्यास मदत होते. तसेच, पोटॅशियम नायट्रेट एक टक्क्यानुसार पिकांवर फवारावे. - दीपक सुपेकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी.

जिल्ह्यात आतापर्यंत पेरणी किती टक्के ?

• जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ९४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक सोयाबीनचा ४ लाख ४० हजार ३६९ हेक्टवर झाला आहे. त्यापाठोपाठ तुरीचा ६६ हजार ३७१ हेक्टरवर पेरा आहे. पिके जोमात उगवली.

• मात्र, पाऊस नसल्याने माळरानावरील कसदार जमिनीवरील पिके कोमेजून जात आहेत. पाणी उपलब्ध असलेले पीक जगविण्यासाठी धडपड करीत आहेत.

हेही वाचा : अवर्षणाच्या फेऱ्यात मिळाली रेशीम शेतीची भक्कम साथ; कुप्पाच्या शेतकऱ्याने ७० गुंठ्यांत घेतले दहा लाखांचे उत्पन्न

टॅग्स :लातूरमराठवाडापाणीपाऊसशेती क्षेत्रशेतकरीशेती