नवी दिल्ली: मोसमी पावसाने आता संपूर्ण देश व्यापला असून, दिल्लीसह उत्तरेत बहुतांश भागांत मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि ओडिशात जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने कहर केला असून, मोठे नुकसान झाले आहे. बिहारमध्ये वीज कोसळून ५ जण ठार, तर गयाजी भागात धबधब्यात अचानक पाणी वाढल्याने सहा मुली वाहून गेल्या. सुदैवाने या सर्वांना वाचवण्यात यश आले.
दिल्लीत रविवारी सात दिवस आधी दाखल झालेल्या मान्सूनने आता चांगला जोर धरला असून, अनेक सखल भाग जलमय झाले आहेत.
दुसरीकडे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि ओडिशासह अनेक राज्यांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर प्रदेशात बहुतांश भागांत पाऊस सुरू आहे.
महाराष्ट्रात जुलैत किती पाऊस पडणार?जुलैमध्ये भारतातील बहुतेक भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, विदर्भ आणि तेलंगणाच्या लगतच्या भागात आणि गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता जास्त आहे. उत्तराखंड आणि हरियाणामध्येही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दोन दिवसात कुठे कोणता अलर्ट?- बुधवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरातील घाटमाथ्यावरील परिसरांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.- गुरुवारी रायगड, सिंधुदुर्गसह पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील परिसरांनाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अधिक वाचा: शेतजमिनीसाठी वारस नोंद कशी केली जाते? सातबाऱ्यावर नाव येण्यास किती दिवस लागतात?